मुक्या प्राण्यांची अन् पक्षांचीही तहान भागवणार! माजी खासदार रणजितसिंह यांच्याकडून स्वखर्चाने पाण्याच्या कुंड्यांची व्यवस्था; आज गिरवी नाका येथून होणार शुभारंभ

उन्हाळ्यात मोकाट प्राणी आणि पक्ष्यांसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून फलटणमध्ये पाण्याच्या कुंड्या उपलब्ध. नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक.

स्थैर्य, फलटण, दि. 18 जून : सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, परिसरात पाणीटंचाईच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. अशा भीषण परिस्थितीत माणसांप्रमाणेच मुक्या आणि मोकाट जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यावर मार्ग काढत, आपले दैवत समान असलेल्या गोमाता आणि इतर मोकाट प्राण्यांची तहान भागवण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.

आज स्वामी समर्थ मंदिरातून शुभारंभ:

या अत्यंत स्तुत्य आणि भूतदयेच्या उपक्रमाचा प्रत्यक्ष शुभारंभ आज, दि. १८ जून रोजी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते गिरवी नाका येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथून करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी दिली आहे.

स्वखर्चाने देणार पाण्याच्या मोठ्या कुंड्या:

वाढत्या उन्हाळ्याचा आणि पाणीटंचाईचा त्रास मुक्या प्राण्यांना होऊ नये या संवेदनशील भावनेतून, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे स्वतःच्या खर्चाने फलटण शहरात ठिकठिकाणी गाई, भटके कुत्रे आणि इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या कुंड्या उपलब्ध करून देणार आहेत. त्यांच्या या भूतदयेच्या निर्णयामुळे कडक उन्हात शहरातील अनेक मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागणार नाही आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल.

पक्षांसाठीही दाणा-पाण्याची सोय:

केवळ मोकाट जनावरांचाच नव्हे, तर आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षांचाही विचार या उपक्रमात करण्यात आला आहे. प्राण्यांसोबतच पक्षांसाठीही ठिकठिकाणी पिकांचे दाणे आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याच्या विशेष सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

कु. सिद्धाली शहा घेणार देखभालीची जबाबदारी:

शहरात केवळ कुंड्या ठेवून हा उपक्रम थांबणार नाही, तर त्यामध्ये नियमितपणे मुबलक पाणी उपलब्ध राहील याचीही काळजी घेण्यात येणार आहे. या कुंड्यांमध्ये नियमित स्वच्छ पाणी भरणे आणि त्या कुंड्यांची वेळोवेळी स्वच्छता राखणे, ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ‘माऊली फाउंडेशन’च्या माध्यमातून नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा या पार पाडणार आहेत.

उन्हाळ्याच्या या कठीण काळात मुक्या प्राण्यांप्रती व पक्षांप्रती दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व कु. सिद्धाली शहा यांच्या या उपक्रमाचे फलटणकरांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Back to top button
Don`t copy text!