फलटण: वनमाला दोशी यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा – वारीला अन्नदान


फलटणमध्ये वनमाला श्रीकांत दोशी यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी साखरेच्या तुलेतून आषाढी वारीसाठी अन्नदानाचा संकल्प करण्यात आला. अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

स्थैर्य, फलटण, दि. 22 मे : वनमाला श्रीकांत दोशी (गुणवरेकर) यांनी ८१ व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त फलटण येथे १७ मे रोजी त्यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी त्यांच्या साखरेच्या तुलेतून मिळालेली साखर आषाढी वारीत माऊली फाउंडेशनच्या अन्नदानासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

संस्कार आणि एकत्र कुटुंबाचा वारसा

हेमंत दोशी, डॉ. अतुल दोशी, अमोल दोशी आणि साजेश दोशी यांच्या सामाजिक कार्यामागे वनमाला दोशी यांचे संस्कार आणि जीवनमूल्यांची शिकवण आहे. घरापुरते मर्यादित न राहता समाजासाठी जगण्याची प्रेरणा त्यांनी आपल्या कुटुंबात रुजवली. मोतीराम दोशी, शांतीलाल दोशी यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सोहळ्यादरम्यान त्यांच्या सुना वैशाली, सुनीता, माधवी आणि नातसून श्रद्धा यांच्या हस्ते त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

साखरेची तुला आणि सन्मानपत्राने गौरव

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे वनमाला दोशी यांची साखरेने करण्यात आलेली तुला. ही सर्व साखर काळबादेवी येथील माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या अन्नदानासाठी दिली जाणार आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचा गौरव म्हणून सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांच्या हस्ते वनमाला दोशी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या अभिष्टचिंतन सोहळ्याला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सचिन बेडके आणि पंकज पवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच गुणवरेकर, वाल्हेकर, निमगावकर, वडुजकर आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल शहा यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!