

स्थैर्य, सातारा, दि. ८ जून : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण कार अपघातातील आठ मृत युवकांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण आठ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर केले आहे.
दुर्घटनेची पार्श्वभूमी आणि मदत:
कोकणातून घरी परतत असताना २४ मे रोजी मध्यरात्री या युवकांची कार दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता.
दिलेल्या शब्दानुसार त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मदतीची तातडीने मागणी केली होती. या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ही एकूण ८ लाख रुपयांची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सातारा (प्रतापगंज पेठ) शाखेतील मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यात वर्ग करण्यात आली असून, याबाबत साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अपघातातील मृत युवक:
-
संदीप काटकर (वय ३५, रा. खटाव – कार चालक)
-
आदित्य अशोक साळुंखे (वय २०, रा. आसगाव)
-
महेश अनिल पवार (वय २५, रा. आसगाव)
-
सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०, रा. आसगाव)
-
रितेश राजेंद्र लोखंडे (वय २३, रा. आसगाव)
-
अंश समीर चव्हाण (वय १८, रा. चिपळूण)
-
उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २२, रा. मर्ढे, ता. सातारा)
-
निखिल अभिमन्यू शिंगटे (वय २३, रा. मर्ढे, ता. सातारा)