दैनिक स्थैर्य | दि. 13 मार्च 2024 | फलटण | गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. फलटण आरटीओसाठी MH – 53 नंबर मंजूर करण्यात आला आहे. काल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फलटण येथे आरटीओ ऑफिसच्या जागेची पाहणी केली. त्यामध्ये फलटण – शिंगणापूर रोड वरील जुने लेडीज हॉस्टेलची जागा अंतिम करण्यात आली आहे. सदरील इमारतीचे डागडुजी, परिसर स्वच्छता व फर्निचर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आगामी काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच फलटण येथे मंजूर असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मानस आहे.
फलटणला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून MH – 53 असा नंबर फलटणला मिळाला आहे. यामुळे फलटणची नवीन ओळख तयार झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने सदरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आहे. याबाबतचा शासन निर्णय काही दिवसांपूर्वी निर्गमित करण्यात आला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यातील जनतेला वाहन पासिंगसाठी व आरटीओ कार्यालयाच्या कामानिमित्त सातारा येथे जावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खर्च व त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत होता. याची दखल घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील जनतेच्या सोईसाठी नवीन आरटीओ कार्यालय नुकतेच मंजूर करून आणले आहे.
लवकरच नवीन कार्यालय बांधण्यासाठी साधारण तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात देण्याची ग्वाही खासदार रणजितसिंह यांनी परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. नवीन कार्यालय सुरु होईपर्यंत सध्या आरटीओ कार्यालय हे फलटण – शिंगणापूर रोड वरील जुन्या लेडीज हॉस्टेलच्या इमारतीमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये रखडलेला विकास पुन्हा सुरु झाला आहे. खासदार रणजितसिंह यांनी फलटण शहरासाठी व तालुक्यासाठी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालय, स्वतंत्र आरटीओ कार्यालय यासोबतच आगामी काळामध्ये खासदार रणजितसिंह हे फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत; असे मत युवा नेते सागर शहा यांनी व्यक्त केले.