दैनिक स्थैर्य | दि. 13 मार्च 2024 | फलटण | भारतीय जनता पार्टीची आगामी लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी नक्की कोणता उमेदवार घोषित करणार याकडे सातारा व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांची संयुक्तिक बैठक दिल्ली येथे झाल्याचे समोर येत आहे. सदर बैठक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्वांची प्रत्येक लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठक सुद्धा संपन्न झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेली आहे. सदरील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देशाच्या दृष्टीने मोठ्या घोषणा होण्याचे शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला जाहीर करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.