‘सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक २०२४’ पुरस्कार सौ. सुजाता सचिन यादव यांना प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १३ मार्च २०२४ | फलटण |
श्रीमंत महाराणी सईबाई साहेब महिला प्रशिक्षण केंद्राद्वारे आयोजित ‘विजयमाला पुरस्कार प्रदान समारंभ २०२४’ हा मुधोजी महाविद्यालय फलटण येथे पार पडला. यावेळी यशस्वी उद्योजिका, के. बी. उद्योग समूह व गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालिका सौ. सुजाता सचिन यादव यांना ‘सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका २०२४’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्काराचे वितरण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, गौरी लागू तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

के. बी. उद्योग समूहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे व रोजगार निर्मितीचे कार्य मोठ्या प्रमाणात होत असून जवळजवळ १५०० पेक्षा जास्त तरुणांना रोजगार पुरवण्यात येत आहे. या कार्याची दखल घेऊन सुजाता यादव यांना सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. के. बी. फाउंडेशनच्या माध्यमातून खास करून महिला सशक्तीकरणासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून महिलांना प्रोत्साहन व मदत देण्याचे कार्य सुजाता यादव यांच्यामार्फत केले जाते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सुजाता यादव व के. बी. उद्योग समूहातर्फे होत असलेल्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार प्राप्तीनंतर के. बी. उद्योग समूहाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोकरीच्या संधी निर्माण करून समाजाला आर्थिक व सामाजिक स्वावलंबी बनविण्याचा निर्धार सुजाता यादव यांनी व्यक्त केला व जास्तीत जास्त महिलांनी उद्योगात उतरावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केले.


Back to top button
Don`t copy text!