फलटण: नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये अवघा १०.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक

नीरा प्रणालीतील धरणांमध्ये सद्यस्थितीला केवळ ५.२५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १७ जून : नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत येणाऱ्या नीरा प्रणालीतील धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून सद्यस्थितीला धरणांमध्ये केवळ १०.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. १७ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चारही धरणांमध्ये मिळून अवघा ५.२५ टीएमसी साठा राहिल्याने चिंता वाढली आहे.

नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चार प्रमुख धरणांची एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ४८.३३ टीएमसी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ८.८१ टीएमसी म्हणजेच १८.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी मात्र धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे.

धरणनिहाय सद्यस्थिती पाहता भाटघर धरणात सध्या १.८४ टीएमसी (७.८३ टक्के) पाणी शिल्लक आहे. वीर धरणात १.७३ टीएमसी (१८.३८ टक्के) उपयुक्त साठा आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ४.६७ टीएमसी इतका होता. नीरा देवघर धरणात १.०१ टीएमसी (८.६१ टक्के) तर गुंजवणी धरणात अवघा ०.६७ टीएमसी (१८.१६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

सिंचन हंगाम पूर्ण झाल्यामुळे सध्या नीरा डावा कालवा आणि नीरा उजवा कालवा या दोन्ही कालव्यांचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. १ मार्चपासून आतापर्यंत नीरा डाव्या कालव्यातून ७.३० टीएमसी तर नीरा उजव्या कालव्यातून १३.०९ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. धरणांची खालावलेली स्थिती पाहता पावसाचे आगमन होईपर्यंत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे.

Back to top button
Don`t copy text!