
स्थैर्य, फलटण, दि. २ नोव्हेंबर : येथील ‘दैनिक सकाळ’चे पत्रकार संजय जामदार यांनी गिरनार परिक्रमा आणि नर्मदा परिक्रमेसाठी सायकलवरून अध्यात्म यात्रेला सुरुवात केली. मालोजीनगर येथील श्री मारुती मंदिरापासून त्यांनी या यात्रेचा श्रीगणेशा केला. ही संपूर्ण यात्रा अंदाजे सहा ते साडेसहा हजार किलोमीटरची असून, ते घरापासून घरापर्यंत सायकलनेच प्रवास करणार आहेत.
जामदार हे फलटण, जेजुरी, आळंदी, नाशिक, सापुतारा मार्गे सुरतला पोहोचून तेथून गिरनार पर्वताकडे जाणार आहेत. वर्षातून एकदाच, कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या पाच दिवसांच्या कालावधीत होणारी, सुमारे ४५ किलोमीटरची गिरनार परिक्रमा ते पायी पूर्ण करतील. त्यानंतर श्री दत्त महाराज, सोरटी सोमनाथ (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक) आणि द्वारका येथील दर्शन घेणार आहेत.
द्वारकेहून ते सायकलनेच श्रीक्षेत्र ओंकारेश्वरला पोहोचतील आणि तेथून नर्मदा परिक्रमेला सुरुवात करतील.
जामदार यांनी यापूर्वीही अशा मोठ्या यात्रा केल्या आहेत. त्यांनी २०१४ मध्ये पायी नर्मदा परिक्रमा, २०२१ मध्ये सायकलवरून नर्मदा परिक्रमा, २०२२ मध्ये पंढरपूर ते पंजाब (घुमान) सायकल यात्रा आणि जानेवारी २०२५ मध्ये महाकुंभ प्रयागराजसह विविध तीर्थक्षेत्रांची सायकल यात्रा पूर्ण केली आहे.

