फलटणच्या आयडियल किड्सच्या विद्यार्थ्याची कुस्तीत बाजी; तालुकास्तरावर प्रथम क्रमांक

फलटणच्या आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वराज कोरडे याने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल, फलटणचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी विश्वराज सचिन कोरडे याने १४ वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्तीच्या ६८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीसह त्याने प्राविण्य प्रमाणपत्र प्राप्त केले असून आता त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेकडे वाटचाल झाली आहे.

बिबी येथे रंगली तालुकास्तरीय स्पर्धा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्या वतीने २०२६-२७ या वर्षातील तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बिबी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ९ व १० सप्टेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत विश्वराजने ही कामगिरी केली.

क्रीडा शिक्षिका शुभदा झणझणे यांचे मार्गदर्शन

विश्वराजला क्रीडा शिक्षिका शुभदा झणझणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा डॉ. वैशाली शिंदे यांनी विश्वराज, त्याचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button
Don`t copy text!