
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ऐतिहासिक फलटण नगरीत दाखल झाला आहे. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत केले असून संपूर्ण शहर भक्तीमय झाले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 8 जुलै :
सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥
गोड तुझे रुप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥ धृ ॥
विठो माऊलीये हाची वर देई ।
संचरोनी राही हृदयामाजी ॥
तुका म्हणे काही न मागे आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥
या भावनेने विठ्ठल दर्शनाच्या ओढीने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम.तुकाराम’ सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा महानुभाव व जैन पंथीयांची काशी समजल्या जाणार्या ऐतिहासिक फलटण नगरीत मुक्कामासाठी विसावला.
तरडगाव येथून प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्विकार करुन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत संध्याकाळी पाचच्या सुमारास फलटण शहरात दाखल झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठु दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे शहराच्या प्रवेशद्वारावर जिंती नाका येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, फलटण नगरपरिषदेच्या विविध समितीचे सभापती, नगरसेवक व नगर परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी व अन्य माण्यवरांनी स्वागत केले.
माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सदगुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक श्री राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने माऊलींसह लाखो भाविकांच्या जनसमुदायाचे स्वागत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजघराण्यातील अन्य मान्यवरांनी केले.
त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमान तळावर मुक्कामासाठी संध्याकाळी सहा वाजता विसावला. वारीत चालणार्या लाखो वारकर्यांपासुन शहर व तालुक्यातील गावकर्यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. समाज आरती नंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणरांनी मोठ्या रांगा लावल्या.
पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा चैतन्याचा, स्फुर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा’ असे वातावरण होते. पालखी सोहळ्याचे आगमन शहरात जरी संध्याकाळी झाले असले तरी वारकर्यांचे सकाळपासुनच शहरात मोठ्या प्रमाणात आगमन होत होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका या मुळे अवघे शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य सर्वत्र दिसुन येत होते. शहरात दिवसभर विविध सहकारी व सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे व फलटणवासीयांकडून ठिकठिकानी मोफत पाणी, चहा, बिस्किटे, अल्पोपहार, फळेवाटप, जेवणाची सोय वारकर्यांसाठी करण्यात आली होती. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्यांच्या सेवेसाठी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्नशील असल्याचे चित्र फलटण शहर व परिसरात सर्वत्र दिसून येत होते.
दरम्यान वारकर्यांना अडचणी येवु नयेत या करीता नीरा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात आले होते त्या मुळे आंघोळ व कपडे धुण्याची उत्तम सोय झाली. या व्यतिरिक्त सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याकरिता नीरा उजवा कालव्यावरील 20 फाट्याला आठ क्यूसेक्स, 22, 23 व 24 फाट्याला प्रत्येकी पाच क्यूसेक्स, 25 फाट्याला दोन क्यूसेक्स व 26 फाट्याला दहा क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले होते. वारकर्यांसाठी पिण्यास पाणी टँकरद्वारे पुरविण्यात आले. पालखी तळावर तात्पुरत्या स्वरुपात शौचालये व स्वच्छता गृहे उभारण्यात आली होती. पुरवठा विभागाच्या वतीने पालखी तळावर गँस सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले होते. आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप करण्यात येत होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा खंडित होणार नाही याची व्यवस्था केली होती. वारकर्यांच्या समस्यांचे व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालखी तळावर नगरपालीकेच्या वतीने मदत केंद्र कक्ष उभारण्यात आला होता. फलटण बस स्थानका समोर यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानात नगरपालिकेने उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात हजारो वारकरी विश्रांतीसाठी विसावले आहेत.