फलटणचा ऐतिहासिक कायापालट!; विकासाचा ध्यास घेतलेला आणि शब्द पाळणारा दूरदृष्टीचा नेता ‘रणजितदादा’!

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटणमध्ये रस्ते, रेल्वे, पाणी प्रकल्प आणि प्रशासकीय कार्यालयांची कामे प्रगतीपथावर असून नागरिकांना मोठ्या सुविधा मिळत आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. 24 जून : गेल्या काही वर्षांपूर्वी फलटणचा एवढा मोठा आणि ऐतिहासिक कायापालट होईल, याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण, “राज्यामध्ये जे जे काही चांगले आहे, ते माझ्या फलटणला मिळालेच पाहिजे”, हा ध्यास घेऊन पछाडल्यासारखे काम करणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ‘व्हिजनरी’ नेतृत्वामुळे आज फलटणने विकासाची उत्तुंग भरारी घेतली आहे. खासदारकीच्या काळात काय केले, असे विचारणाऱ्या विरोधकांच्या तोंडावर टीकाटिप्पणी न करता, माजी खासदार रणजितसिंह यांनी केवळ आपल्या भक्कम कामातून सणसणीत उत्तर दिले आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्यानंतर जी स्वप्ने फलटणकरांना दाखवली होती, ती आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. त्यावेळी अशी स्वप्ने बघण्याचे धाडस सुद्धा फलटणकर नागरिक करत नव्हते. त्यामुळेच आज शब्द पाळणारा दूरदृष्टीचा नेता ‘रणजितदादा’ अशी त्यांची ओळख अधिक गडद झाली आहे.

प्रशासकीय क्रांती: कालच निघाली अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाची अधिसूचना!

फलटणमध्ये आरटीओ (RTO) ऑफिस सुरू होईल, दिवाणी व फौजदारी जिल्हा न्यायालय सुरू होईल, याचा कोणी विचारही केला नव्हता. पण हे सर्व रणजितदादांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले. या विकासात आणखी एका सुवर्णपानाची भर पडली आहे. कालच राज्य शासनाच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, फलटण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येणाऱ्या अवघ्या काही दिवसांतच ही दोन्ही कार्यालये दिमाखात सुरू होतील आणि सर्वसामान्यांची मोठी सोय होईल.

रस्त्यांचे आणि महामार्गांचे भव्य जाळे – फलटण बनले ‘हायवे हब’

रणजितदादांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष मंजुरी मिळवून रस्त्यांचे जे जाळे विणले आहे, त्यामुळे फलटणची ओळख आता ‘हायवेवरील शहर’ अशी झाली असून स्थानिक बाजारपेठेला मोठी चालना मिळाली आहे.

  • पालखी महामार्गाला विशेष मंजुरी: पालखी महामार्ग अनेक शहरांच्या बाहेरून जातो, मात्र दादांनी विशेष प्रयत्न करून फलटण शहरात अंतर्गत पालखी महामार्ग मंजूर करून घेतला नुसता मंजूर करून घेतला नाही तर त्याचे कामकाज आता युद्धपातळीवर सुरु आहे. यासोबतच शहरातील अंतर्गत पालखी मार्गातून सुद्धा शिल्लक राहिलेल्या जिंती नाका ते नाना पाटील चौक आणि नाना पाटील चौक ते विडणी (अब्दागिरी वस्ती) असा शहरांतर्गत ‘मिसिंग मार्ग’ थेट नितीन गडकरी यांच्याकडून विशेष मंजूर करून घेतला आहे.

  • मुंबई ते बंगलोर हरित महामार्ग : केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाचा असणारा मुंबई ते बंगलोर हरित महामार्ग हा फलटणमधून जाण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अथक पाठपुरावा केला आहे, त्याचेच फलित म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः हा महामार्ग फलटणमधून जाणार असल्याची घोषणा अनेकदा केली आहे. यामुळे फलटणमधून मुंबईकडे जाणारी व फलटणमधून कोल्हपुर, बंगलोरकडे जाणे सोपे होणार आहे. यासोबतच स्थानिक बाजारपेठ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
  • रावरामोशी पुलाचे चौपदरीकरण: कायम अपघातांचे केंद्र असलेल्या आणि दर पालखी सोहळ्यात जिथे अपघात ठरलेलाच असतो, त्या रावरामोशी पुलाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर हे ‘अपघात प्रवण क्षेत्र’ कायमचे नष्ट होईल. तसेच बाणगंगा नदीवर स्मशानभूमीशेजारी पूल नव्याने बांधण्यात येत आहे.
  • बारामती-फलटण-सांगली सिमेंट रस्ता: या भव्य सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामधील पहिला टप्पा बारामती ते फलटण हे कामकाज जवळपास पूर्ण झाले आहे. आता फलटण ते दहिवडी या रस्त्याचे कामकाज सुरु आहे. यांतर्गत येणाऱ्या मोगराळे घाटात अत्यंत कमी वळणे ठेवून ‘हायटेक टेक्नॉलॉजी’ने रस्ता बनवला जात आहे. यामुळे या संपूर्ण पट्ट्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.

  • वाठार स्टेशन फाटा (फौजी ढाबा) रस्ता: फलटण (वाठार निंबाळकर फाटा) ते वाठार स्टेशन फाटा या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, काही ठराविक पॉईंट्सचे काम वगळता अवघ्या काही दिवसांत हा रस्ता पूर्णत्वास जाईल.

  • आसू ते गिरवी व पुसेगाव रस्ता: फलटण-गिरवी आणि फलटण-आसू असा सिमेंट काँक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. तसेच फलटण-पुसेगाव रस्ता अतिशय उच्च दर्जाचा बनवला आहे. शहरात कोणत्याही बाजूने प्रवेश केला तरी भव्य रस्त्यांचे दर्शन घडते.

राज्यातील पहिला ‘कालवा जोड प्रकल्प’ आणि रेल्वेचे मोठे नेटवर्क

  • निरा-देवघरचे पाणी: नीरा देवघरचे पाणी फलटणला येईल, अशी फक्त भाषणेच फलटणमध्ये होत होती परंतु केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नियमित पाठपुरावा करत नीरा देवघर प्रकल्पाचे कामकाज सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यासोबतच धोम – बलकवडीचा कालवा बारमाही होण्यासाठी ‘राज्यातला पहिला कालवा जोड प्रकल्प’ फलटणसाठी होत आहे, हे सुद्धा माजी खासदार रणजितसिंह यांनी वास्तवात आणले आहे.

  • फलटण-बारामती रेल्वे प्रकल्प: या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येणाऱ्या काही महिन्यांत हे काम पूर्ण होताच, बारामतीवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक फलटणमार्गे होईल. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली येथून दौंड मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे मार्गे न जाता थेट फलटण मार्गे धावतील. यामुळे फलटणमध्ये रेल्वेचे एक भव्य हब तयार होणार आहे.

विरोधकांना कृतीतून चपराक!

केवळ राजकारण करणाऱ्या विरोधकांसाठी फलटणमध्ये उभे राहिलेले हे भव्य प्रकल्प म्हणजे एक मोठी चपराक आहे. बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा हा नेता फलटण तालुक्याला खऱ्या अर्थाने देशाच्या नकाशावर ‘रोल मॉडेल’ बनवत आहे.

Back to top button
Don`t copy text!