फलटणमध्ये संत सावता माळी महाराजांना आदरांजली; आमदार सचिन पाटलांच्या हस्ते रथाचे पूजन

संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटण शहरात रथाची प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते रथाचे पूजन करून महाराजांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑगस्ट : संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटण येथील नाना पाटील चौकातील मंदिरात दर्शन घेऊन त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली. या निमित्ताने शहरात महाराजांच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या रथाची प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली असून, आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते रथाचे पूजन करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

भक्ती आणि कर्माचा संदेश

संत सावता माळी महाराज यांनी आपल्या अभंगातून समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, जातीयवाद आणि अंधश्रद्धेला फाटा देत समतेचे रूप समाजासमोर मांडले. प्रपंच आणि शेतीची कामे करत असताना विठ्ठलभक्ती करून ‘कर्म हीच ईश्वरसेवा’ असल्याचा महान संदेश त्यांनी दिला. ‘सावता सागर, प्रेमाचा आगर! घेतला अवतार माळ्या घरी!!’ या संत नामदेवांच्या वचनाचे स्मरण करत भाविकांनी सावता महाराजांप्रती आदर व्यक्त केला.

भाविकांना दर्शनाचे आवाहन

गतवर्षीप्रमाणे यावर्षीही फलटण शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथाची प्रदक्षिणा काढण्यात येत आहे. सर्व भाविकांनी या रथाचे आणि महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले. यावेळी संत सावता माळी मंदिर ट्रस्टचे चेअरमन मनीष जाधव, बाळासाहेब ननवरे, गोविंद भुजबळ, विकास शिंदे, बापूराव शिंदे, रणजित भुजबळ, सुभाष ननवरे आणि विक्रम शिंदे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!