वृक्ष लागवड, संवर्धनासाठी जनतेने पुढे यावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२३ । छत्रपती संभाजीनगर । देशात विविध महामार्गावर आतापर्यंत महामार्ग प्राधिकरणाने ३ कोटी ५० लाख झाडे लावली असून ६१ हजार झाडांची पुनर्लागवड केली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी आज पैठण येथे औरंगाबाद – पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांच्या यशस्वी पुनर्लागवड प्रकल्पाची पाहणी केली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, सिने अभिनेते सयाजी शिंदे, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्‍लागार अशोक कुमार जैन, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रविंद्र इंगोले, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, तहसीलदार विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले की, पैठण येथे ५१ वृक्ष पुनर्लागवडीचा झालेला यशस्वी प्रयोग पाहून आनंद झाला. समाजात पर्यावरण संवर्धनासाठी हा प्रयोग प्रेरणा देणारा ठरेल. वृक्ष लागवडीचे हे ठिकाण गार्डन म्हणून विकसित करा, जेणेकरून पैठणला आलेले भाविक भक्त येथे येतील व प्रेरणा घेतील. याच प्रेरणेतून गावागावात असे प्रकल्प उभे राहतील. अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलेले काम नक्कीच प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.

पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून श्री.गडकरी म्हणाले की, सामजिक, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थानी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा. देशात वृक्षलागवड चळवळ उभी रहावी. बांबू लागवडीमुळे अनेकांना रोजगार मिळाला. गवतवर्गीय पीक असलेल्या बांबूची लागवड पडीक जमिनीतही केली जाते. शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर बांबूची लागवड केल्यास वर्षानुवर्षे त्यापासून उत्पादन मिळेल. बांबूला चांगला भाव न मिळाल्यास ऊसाप्रमाणे दर ठरविण्याची शासनाची तयारी आहे असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनाना प्रोत्साहन देण्यात येत आहे. इलेक्ट्रिक ट्रक व ट्रॅक्टर लवकरच येत आहेत. आपल्याला प्रदूषण मुक्त वातावरण तयार करायचे आहे, त्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल. असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले की, पैठण येथे ५१ वृक्षांची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग झाला. हे नक्कीच मोठे काम आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे, यातून दळणवळण सुलभ होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्‍लागार अशोक कुमार जैन यांनी प्रास्ताविक केले. राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्याने सुरू असलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वन विभाग, महसूल तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!