दैनिक स्थैर्य | दि. 13 जून 2023 | फलटण | फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांची बदली होऊन त्यांच्या जागी सचिन ढोले यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. सचिन ढोले यांनी फलटण उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे. सचिन ढोले हे इलेक्ट्रिकल इंजिनियर असून सन 2004 च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर ते सन 2009 साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाले आहेत.
सचिन ढोले हे नागपूर येथील मिहान प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी नागपूर ग्रामीण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कामकाज पाहिलेले होते. तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा ढोले यांनी काम केलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी कामकाज केलेले आहे. यासोबतच त्यांनी पुणे येथे अन्नधान्य वितरण अधिकारी तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून सुद्धा काम केलेले आहे.
पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केले असून आषाढी व कार्तिकी वारीच्या नियोजनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
ढोले हे पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी असताना त्यांच्या काळामध्ये पालखी महामार्गाचे भूसंपादन व श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आराखड्याचे काम त्यांनी केले आहे. प्रशासकीय कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे.