दैनिक स्थैर्य | दि. २० एप्रिल २०२४ | फलटण |
लोणंद ते फलटण रस्त्यावर तांबमळा, फरांदवाडी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत हॉटेल महाराजासमोर शुक्रवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वैरण घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीने पादचार्यास धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचार्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर ट्रॉलीचालक अनंत जयवंत पांढरे (रा. बेलसर, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात विकास सुदाम जगताप हे मयत झाले असून सुदाम नारायण जगताप यांनी या घटनेची फिर्याद पोलिसात दिली आहे.
या अपघाताची अधिक माहिती अशी, शुक्रवारी ट्रॅक्टरचालक अनंत जयवंत पांढरे याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र. एमएच-१२-क्यूटी-१०८८) व त्यास जोडलेल्या ट्रॉली (क्र. एमएच-१२-जीएन-९७४९) ने बेलसर, ता. पुरंदर ते शिंगणापूर, ता. माण, जि. सातारा येथे कावडीतील बैलांचा चारा, वैरण घेवुन जात असताना त्याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून पादचारी विकास सुदाम जगताप यांना धडक दिल्याने या अपघातात गंभीर जखमी होऊन विकास जगताप यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताचा अधिक तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.