दैनिक स्थैर्य | दि. २० एप्रिल २०२४ | सातारा |
कराड शहरात असणार्या शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे चोरी करणार्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघड करून ५२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक चारचाकी वाहन असा एकूण ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रमेश महादेव कुंभार (रा. कशेळी, ता. भिवंडी, जि. ठाणे) व निलेश शामराव गाढवे (रा. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
या घटनेची सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडातील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे पंधरा दिवसांपूर्वी चोरट्यांनी घराची खिडकी उचकटून, खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ३८ लाख रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पोबारा केला होता. या चोरीची कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती.
या चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखा कराडचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी, साक्षीदार व आजूबाजूच्या लोकांकडे तपास केला. तसेच घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला. या वाहनाची पडताळणी केली असता हे वाहन पोलीस रेकार्डवरील रमेश कुंभार याचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस आरोपी राहत असलेल्या ठाणे येथे जाऊन त्याच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात वेषांतर करून चार दिवस पाळत ठेवून होते. तसेच पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना रमेश कुंभार हा सातारा बसस्टँड परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास पथकांना रमेश कुंभार याला ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रमेश कुंभार व त्याच्यासोबत असणार्या निलेश गाढवे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी फलटण भागातही चोरी तपासात मान्य केले आहे.
या आरोपींकडून पोलिसांनी चोरीस गेलेले ५२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेली गाडी असा एकूण ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.