
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, आरक्षणाच्या आडून लोकसभेचे संख्याबळ वाढवण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप अभय छाजेड यांनी साताऱ्यात केला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २१ : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत अंमलबजावणीतील विलंब आणि आकडेवारीतील संदिग्धतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघांची पुनर्रचना व लोकसभेचे संख्याबळ वाढवण्याचे मोठे षडयंत्र भाजपने रचले असल्याची जोरदार टीका महाराष्ट्र काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड यांनी केली.
सातारा येथील काँग्रेस भवनमध्ये आज (दि. २१ एप्रिल) महिला आरक्षणाविषयी भाजपच्या प्रचाराबाबत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अभय छाजेड यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, सचिव यासिन शेख, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा घोरपडे, सातारा शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा रजनी पवार, मनोज तपासे, सुरेश इंगवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
‘५४३ जागांमध्येच महिला आरक्षण लागू करा’
महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत भूमिका स्पष्ट करताना छाजेड यांनी सरकारकडून पारदर्शकतेची मागणी केली. “लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण लागू करावे, ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे. मात्र लोकसभेच्या जागांसाठी ‘८५०’ हा आकडा नेमका कशाच्या आधारे पुढे आणला जात आहे, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या धोरणामुळे मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ते लागू केले गेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
‘अंमलबजावणीबाबत अनिश्चितता’
२०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असले, तरी त्याची अंमलबजावणी २०२९ नंतर करण्याचा प्रस्ताव असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी मोठी शंका व्यक्त केली. जनगणना प्रक्रियेचा आधार देत अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात आहे; ती वेळेत पूर्ण होईल का, याबाबत अनिश्चितता असल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात काँग्रेसची भूमिका कायम महत्त्वाची राहिली असून, राहुल गांधी यांनीही यासाठी मोठा संघर्ष केल्याचा दावा छाजेड यांनी केला.
राजेंद्र शेलार यांचे भाजपला खुल्या चर्चेचे आव्हान
“सत्ता आणि अफाट संपत्तीच्या जिवावर भाजप महिलांच्या पाठिंब्याचे मेळावे घेत आहे. परंतु त्यांच्यात खरेच हिंमत असेल तर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी समोरासमोर खुली चर्चा करावी. आम्ही त्यांचे षडयंत्र उघड करू. राजवाड्यासमोर गांधी मैदानावर त्यांनी खुल्या चर्चेचे हे आव्हान स्वीकारावे.”
– राजेंद्र शेलार (सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस)

