
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा भरारी पथकाने खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे धाडसी कारवाई करत ४२० लिटर हातभट्टी दारू आणि वाहनासह एकूण ४ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थैर्य, शिरवळ (सातारा), दि. २२ : जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून, विभागाच्या सातारा भरारी पथकाने शिरवळ (ता. खंडाळा) येथे धाडसी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत बेकायदेशीर हातभट्टी दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण ४ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सापळा रचून ‘वॅगनआर’वर कारवाई
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी शिरवळ परिसरातून बेकायदेशीर हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार पथकाने सापळा रचून एका मारुती सुझुकी वॅगनआर गाडीची कसून तपासणी केली. या तपासणीत ३५ लिटर क्षमतेचे एकूण १२ प्लास्टिकचे कॅन मिळून आले. या कॅनमध्ये तब्बल ४२० लिटर हातभट्टी दारू आढळून आली.
दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल
संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा (रजिस्टर नं. १२७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या भरारी पथकात निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, सागर आवळे, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, अरुण जाधव आणि बाळासो पांचुदे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण करत आहेत.
अवैध दारूची माहिती देण्याचे आवाहन
“सातारा जिल्ह्यामध्ये कुठेही बनावट दारू किंवा हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल,” असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांनी केले आहे.

