एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी : स्वप्नील घोंगडे


 

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि, 20 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक जाणिवेतून आदर्शनिर्माण करत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्‍यावर कारवाई केली जाणार व शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी केले.

वाठार स्टेशन येथे शिवसाई मंगल कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वाठार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणार्‍या 48 गावातील सरपंच, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते. धुमाळ व  सरपंच यादव यांनी मार्गदर्शन केले.

घोंगडे म्हणाले, सध्या संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांनी आरोग्याची काळजी घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात वाठार पोलीस ठाण्यांतर्गत असणार्‍या गावांनी ‘एक गाव एक गणपती’ बसवावा व प्रशासनाला सहकार्य करावे. गणपतीची वर्गणी काढू नये, कोणालाही वर्गणीबाबत सक्ती करू नये, शासनाने दिलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे, सामाजिक अंतर ठेवावे, ‘श्री’ ची मूर्ती 4 फुटाची असावी, 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते नसावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, कोरोना विषयी लोकांच्यात जनजागृती करावी, सार्वजनिक ठिकाणी काही गैरप्रकार घडणार नाहीत याची मंडळाने दक्षता घ्यावी. समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाकडून सहकार्य राहील,  कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करून त्या मंडळावर गुन्हे दाखल केले जातील, याची मंडळांनी दक्षता घ्यावी.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून आपापल्या गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवावी. आतापर्यंत 30 गावांनी एक गाव एक गणपती बसवण्याबाबत पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. या अगोदर 22 गावांचा समावेश तर त्यामध्ये वाघोली, पिंपोडे खुर्द, भाडळे, देऊर, तडवळे, अनपटवाडी, अरबवाडी व  चिलेवाडी अशा गावांचा नव्याने समावेश आहे. इतर राहिलेल्या गावांनीही त्यांचा आदर्श घ्यावा. गणेशोत्सव काळात कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास सदरच्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!