नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार


स्थैर्य, पुणे, दि.१६: बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे खुलासा करताना आरोप करणाऱ्या रेणू शर्माची बहीण करुणा शर्माशी आपले विवाहबाह्य संबंध असून त्यातून दोन मुले जन्माला आल्याची व त्यांना आपण आपले नाव दिल्याची जाहीर कबुली दिली आहे. हे ध्यानात घेता, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली‌. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांची कबुली प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची आपण मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरोप गंभीर असून लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले होते. पवार यांची राजकीय कारकीर्द ध्यानात घेता ते अशा आरोपानंतर स्वतःहून कारवाई करतील असे वाटले होते. पण पवार यांनी नंतर घुमजाव केले. बलात्काराच्या आरोपांची चौकशी केलीच पाहिजे. पण बलात्काराचे आरोप आणि विवाहबाह्य संबंधांची कबुली या दोन प्रकरणांची गल्लत करू नये. मंत्र्यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे किंवा शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

त्यांनी सांगितले की, आतापर्यंत अशा प्रकारे लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. सन १९८४ साली महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांनी विमानात गैरवर्तन केल्याचा आरोप हवाई सुंदरीने केला होती. त्यावेळी १४ मंत्री आदिक यांच्यामागे ठामपणे उभे होते. पण तरीही त्यांना राजीनामा द्यावा लागला. सन २००९ साली आंध्र प्रदेशचे राज्यपाल एन. डी. तिवारी यांना त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजीनामा द्यावा लागला होता. सन २०११ मध्ये राजस्थानचे जलसंपदामंत्री मदेरणा यांनाही नर्सचे अपहरण आणि लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला होता. सन २०१३ मध्ये राजस्थानचे दुग्धविकास मंत्री बाबुलाल नागर यांनाही बलात्काराच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला होता. सन २०१६ मध्ये दिल्लीचे समाजकल्याण मंत्री संदीप कुमार यांची अश्लिल व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजीनामा द्यावा लागला होता. तसेच २०१८ मध्ये एम.जे. अकबर यांच्यावर महिला पत्रकाराने आरोप केल्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या उदाहरणावरून मा. शरद पवारांनी नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा.

ते पुढे म्हणाले की, दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांचा राजीनामा घेताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, ‘माझ्या ६७ आमदारांना राजीनामा द्यावा लागला तरी चालेल. पण अशा घटना कदापिही खपवून घेतल्या जाणार नाहीत.’ राजस्थानचे मंत्री बाबुलाल नागर यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हणाले होते की, ते निर्दोष आहेत. पण आरोप झाल्याने राजीनामा देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण पदावर राहिल्यास याची निष्पक्षपणे चौकशी होणार नाही, असे आपण समजतो. ही उदाहरणे ध्यानात घेऊन धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल. सोमवारी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात येईल.


Back to top button
Don`t copy text!