
नीरा उजवा कालवा विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणांत मिळून अवघा ५.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २५ जून : नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत येणाऱ्या नीरा प्रणालीतील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा अत्यंत खालावला असून सध्या केवळ १०.७४ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. मागील वर्षी याच काळात धरणांमध्ये ४१.८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, त्या तुलनेत यंदा पाणीपातळी गंभीररीत्या खाली आल्याने फलटणसह संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांची एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ४८.३३ टीएमसी आहे. मात्र, सध्या या सर्व धरणांमध्ये मिळून केवळ ५.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी २५ जून रोजी या धरणांमध्ये २०.२४ टीएमसी पाणी उपलब्ध होते.
धरणनिहाय पाणीसाठ्याची सद्यस्थिती पाहिल्यास, २३.५० टीएमसी क्षमतेच्या सर्वांत मोठ्या भाटघर धरणात केवळ १.८३ टीएमसी (७.७९%) पाणी शिल्लक आहे. वीर धरणात १.६६ टीएमसी (१७.६४%), नीरा देवघर धरणात १.०३ टीएमसी (८.७८%) आणि गुंजवणी धरणात अवघे ०.६७ टीएमसी (१८.१६%) पाणी राहिले आहे.
धरण क्षेत्रात आतापर्यंत झालेला पाऊस अत्यंत कमी असून गुंजवणी येथे ८९ मिमी, नीरा देवघर येथे ६७ मिमी, वीर येथे ४३ मिमी तर भाटघर क्षेत्रात सर्वात कमी २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास आगामी काळात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.