सरकारी कर्मचा-यांसाठी आता नवीन ‘ड्रेस कोड’, मंत्रालयात जीन्स, टी- शर्ट घालण्यास बंदी


 

स्थैर्य, मुंबई, दि.१२: शासकीय कर्मचा-यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशात सरकारी कर्मचा-यांना आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसेच स्लीपर्सच्या न वापरण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.

महिला कर्मचा-यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचा-यांनी खादीचे कपडे घालावेत असे देखील नव्या नियमात सांगितले आहे.

शासकीय कर्मचा-यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

ड्रेसकोडचे नवे नियम

परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.

पुरूष कर्मचा-यांनी शर्ट आणि पँट घालावी. जिन्स आणि टी शर्ट घालू नये.

महिला कर्मचा-यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालावे.

कर्मचा-यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचा-यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.

गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा. कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!