मराठा क्रांती मोर्चाचा आझाद मैदानावर एल्गार; 14 आणि 15 डिसेंबरला उपोषण


 

स्थैर्य, दि.१२ : सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला मिळालेल्या स्थगिती आदेशापूर्वी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ईएसबीसी आणि एसईबीसी उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी उपोषण करण्यात येणार आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या 10 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत समन्वयकांनी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी एक डिसेंबर रोजी उमेदवारांच्या नियुक्तीसाठी महावितरणसमोर आंदोलन करण्यात आले आहे. शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्ग तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील नोकरीसाठी नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाडी मोर्चास प्रतिबंध घातला आहे. यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील आणि आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागणार आहे. ईएसबीसी आणि एसईबीसी उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न, सारथी संस्था गतिमान करणे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला, मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित खटले मागे घेणे यांसह इतर मागण्या सोडविण्यासाठी आमदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सोडवावेत, असे आवाहन सकल मराठा समाज- मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नसल्यास आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घ्यावी. याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक आमदाराला निवेदन देणार आहे. 

येत्या 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या मुद्यावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचून पुढील आंदोलनाबाबत जनजागृती करावी. तसेच, न्यायालयीन लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!