
थेट WhatsApp वर मिळवा
लहान मुलांच्या पोषण आहारातील त्रुटी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे एफएसएसएआयने नेस्टले इंडियाविरुद्ध न्यायालयात तीन खटले दाखल केले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. १८ सप्टेंबर : लहान मुलांच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) प्रसिद्ध कंपनी ‘नेस्टले इंडिया’विरुद्ध मोठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. एफएसएसएआयने नेस्टलेच्या ‘नॅन एक्सेल प्रो स्टेज १’, ‘लॅक्टोजेन प्रो १’ आणि एका पाठपुरावा फॉर्म्युला (Follow-up Formula) उत्पादनाविरोधात अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात तीन स्वतंत्र खटले दाखल केले आहेत.
जाहिरातींचे उल्लंघन आणि घटकांमधील त्रुटी
नेस्टले कंपनीच्या ‘नॅन एक्सेल प्रो स्टेज १’ आणि ‘लॅक्टोजेन प्रो १’ या उत्पादनांच्या जाहिराती आणि माहितीपत्रकांद्वारे अन्न सुरक्षा मानके (लहान मुलांचे पोषण) नियम २०२० मधील कलम ४(२) चे उल्लंघन झाल्याचे तपासात उघड झाले आहे. याशिवाय, लहान मुलांच्या दुधाचे पर्याय आणि बालआहार नियमावलीनुसार अशा उत्पादनांची थेट विक्री वाढवण्यासाठी जाहिरात करण्यास बंदी असतानाही नियमांची पायमल्ली करण्यात आली.
बायोटिन घटकाचे प्रमाण आढळले कमी
प्रयोगशाळेतील तपासणीदरम्यान नेस्टलेच्या एका पाठपुरावा फॉर्म्युला उत्पादनात ‘बायोटिन’ या पोषक घटकाचे प्रमाण ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी आणि सब-स्टँडर्ड (अSub-standard) आढळले आहे. या नमुन्याची पुनर्तपासणी केली असता, त्यातही नियमांनुसार आवश्यक बायोटिन नसल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर त्रुटींची दखल घेत एफएसएसएआयने नेस्टले इंडियावर थेट कायदेशीर बडगा उचलला आहे.