वेदनेशी एकरूप होऊन नवसाहित्यिकांनी लिखाण करावे – प्राचार्य शांताराम आवटे

दहाव्या साहित्य संवाद कार्यक्रमात निसर्गाच्या सान्निध्यात पुस्तक प्रकाशन


दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | फलटण |
जीवनात आपल्याबरोबर चांगली माणसे व पुस्तके असावी लागतात. त्यामुळे आपले आयुष्य घडते. आयुष्य घडवायचे की बिघडावयाचे हे आपल्या हातात असते. आपली योग्य विचार प्रक्रिया आपल्याला योग्य दिशेने घेऊन जाते, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे हे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा काढणारे पाहिले व्यक्तिमत्त्व होय. वंचित, शोषित यांना लेखणी व साखरशाळा यांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम त्यांनी केले.

‘मेंढका’ व ‘सर्जा’ या कादंबरीच्या माध्यमातून वंचितांच्या व्यथा व प्राणी प्रेम दिसून येते. वास्तववादी दर्जेदार साहित्य निर्माण केले. नवसाहित्यिकांनी या दर्जेदार साहित्याचा योग्य बोध घ्यावा, असे विचार साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नाना नानी पार्क फलटण येथे आयोजित केलेल्या दहाव्या साहित्य संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी संपादित केलेल्या सर्जा आणि मेंढका ग्रामीण साहित्य समीक्षा या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी माजी प्राचार्य शांताराम आवटे यांनी व्यक्त केले.

यावेळी संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्राचार्य रविंद्र येवले, प्रा. विक्रम आपटे, महादेव गुंजवटे, पत्रकार रमेश आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य शांताराम आवटे पुढे म्हणाले की, वेदनेशी एकरूप होऊन लिखाण केल्यास संवेदनशील मनातून साहित्याचा खजिना बाहेर पडतो, सर्जा व मेंढका ही त्याचीच प्रतीके आहेत. खुल्या निसर्गाच्या सानिध्यात पुस्तक प्रकाशन हा स्तुत्य उपक्रम आहे. साहित्यिक संवादातून नवी दिशा मिळत आहे.

यावेळी पत्रकार रमेश आढाव म्हणाले की, भूतदया व मानवी प्रेम याचा सुरेख संगम या समीक्षा पुस्तकातूनही आपणापुढे येत आहे. यातील प्रत्येक लेख मानवी मनाचा ठाव घेत आहे व नव्या साहित्यिकांना प्रेरणा मिळत आहे.

यावेळी दिलीप पिसाळ, महादेव गुंजवटे, अतुल चव्हाण, अ‍ॅड. आकाश आढाव, विकास शिंदे, प्रा. विक्रम आपटे, प्राचार्य रविंद्र येवले, सुलेखा शिंदे, अनिता पंडित, महादेव गायकवाड, सुनीता सावंत, कोरडे ज्ञानेश्वर यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माणदेशी साहित्यिक व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटणचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार रानकवी व वन अधिकारी राहुल निकम यांनी मानले. यावेळी महादेव गायकवाड श्रेयस कांबळे, संजय पांचाळ, गजानन अनपलवार, सचिव जाधव, अ‍ॅड. रोहिणी भंडलकर, महेश डांगे, अर्चना गुंजवटे, भाग्यश्री डांगे, स्नेहा गुंजवटे व साहित्यप्रेमी साहित्य रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!