मराठी साहित्य संमेलनावर राष्ट्रवादीची छाप; स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड


स्थैर्य, नाशिक , दि . २६: साहित्य संमेलनात राजकारण्यांचे काय काम? त्यांनी व्यासपीठावर नव्हे तर समाेर बसावे. साहित्य महामंडळ पदाधिकारी अशा कितीही वल्गना करत असले तरी राजकारण्यांच्या गळ्यात माळ घातल्याशिवाय संमेलन पूर्णच हाेऊ शकत नाही हेच नाशिकच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड करून त्यांनी दाखवून दिले आहे. साहित्य महामंडळाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे मात्र आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

नाशिकमध्ये हाेत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी स्वागत समितीने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड केली आहे. भुजबळांकडून तसे अधिकृत संमतिपत्रही मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर उपाध्यक्षपदी कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गाेएसाेचे सर्वेसर्वा माे. स. गाेसावी आणि डाॅ. प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या कार्याध्यक्षपदीही राष्ट्रवादीचे काेषाध्यक्ष आमदार हेमंत टकले आणि समिती समन्वयक म्हणूनही राष्ट्रवादीचेच सहकाेषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांची नियुक्ती केल्याचे साेमवारी (दि. २५) संमेलनाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. यातील भुसे यांचे नाव साेडले तर इतर सगळीच नावे ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून येतात. यावरूनच संमेलनावर राष्ट्रवादीची छाप असल्याचे अधिक अधाेरेखित हाेते. लाेकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांची संमेलनाचे मुख्य कार्यवाह म्हणून निवड झाली आहे. संमेलनाच्या नियाेजनासाठी ३९ समित्या तयार करण्यात येणार आहेत.

शासनाकडून आवश्यक ते सहकार्य : संमेलनातून नाशिकची वेगळी आेळख निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून हे संमेलन उजवं कसं हाेईल यासाठी प्रयत्न करणार आहाेत. संमेलन पार पडत असताना नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा आदरपूर्वक सन्मान राखला गेला पाहिजे. नाशिककर म्हणून स्वागतात कुठलीही कमतरता पडणार नाही, असे सूक्ष्म नियाेजन करणार आहाेत. संमेलनासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. त्यात कुठलीही कमतरता राहणार नाही, असे नियाेजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले.

भूमिका असणाऱ्यांना हरकत नाही : संमेलनाच्या नियाेजनात सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भरणा आहे. यावर हेमंत टकले म्हणाले की, महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी असं काहीही नाही. यात दाेन कॅबिनेट मंत्री आहेत. एक विधानसभा उपाध्यक्ष आहेत. हे पद खूप माेठे आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. शिवाय ज्या राजकीय व्यक्तींना स्वत:ची काही अशी भूमिका आहे त्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर, नियाेजनात सहभाग घ्यायला काहीच हरकत नाही, असे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही यापूर्वीच जाहीर केले आहे. संमेलनासाठी मदत, अनुदान मिळवण्यासाठी शासनाकडे जावेच लागणार असल्याचे ते म्हणाले.

सगळेच राजकारणी मार्गदर्शक
संमेलनात राजकारण्यांचा भरणा नकाे असे कितीही म्हणत असले ती आेठावर एक आणि कृतीत एक असेच साहित्य महामंडळ आणि आयाेजकांचे सुरू आहे. संमेलनासाठी दाेन समित्या जाहीर करण्यात आल्या. त्यात मार्गदर्शक समितीत शहराचे महापाैर, उपमहापाैर, जिल्ह्यातील दाेन्ही खासदार, सगळे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, महापालिकेतील विराेधी पक्षनेते, सर्व पक्षांचे गटनेते यांचाच भरणा आहे. त्यात शहरातील एकाही वरिष्ठ वा प्रतिष्ठिताचे नाव दिसत नाही. तसेच सल्लागार समितीतही महसूल आयुक्त, महापालिकेचे आयुक्त, पाेलस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुक्त विद्यापीठ आणि आराेग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांना घेण्यात आले आहे. शहरातील इतर कुणालाही या समितीतही स्थान देण्यात आलेले नाही.


Back to top button
Don`t copy text!