स्थैर्य,मुंबई, दि. ५: शेअर बाजारांत विक्रमी तेजी सुरू असताना मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवलानेही विक्रम नोंदवला. गुरुवारी हे भांडवल २०० लाख काेटींवर गेले. बीएसईचे एकूण बाजार भांडवल २,००,४७,१९१.३३१ कोटी रुपये (२.७५ लाख काेटी डॉलर) झाले. गुरुवारी २,०३,४०६.३२ कोटींची (१.०३%) वाढ झाली. बुधवारी ते १,९८,४३,७८४.९९ कोटी होते.
गेल्या चार सत्रात सेन्सेक्सने ४,३२८.५२ अंकांची वाढ नोंदवली आहे. बीएसईचे बाजार भांडवल १४,३४,५४७.२८ कोटी रुपयांनी (७.७१%) वाढले आहे. गेल्या महिन्यात २९ जानेवारीला ते १,८६,१२,६४४.०३ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी सेन्सेक्स १५.७% वधारला होता. अँटनी वेस्ट हँडलिंग, इंडियन रेल्वे फायनान्स कार्पाेरेशन, इंडिगो पेंट्स व होम फर्स्ट फायनान्स कंपनीने बीएसईच्या बाजार भांडवलात ५२५६२.२१ कोटी रुपये जोडले.