फलटण: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; पंप चालकांची ‘क्रेडिट’ सुविधा बंद, इंडियन ऑईलचा डेपो पुन्हा मिरजला हलवला


फलटण शहर व तालुक्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, पंप चालकांना मिळणारी क्रेडिट सुविधा कंपन्यांनी बंद केली आहे. तसेच, इंडियन ऑईलने आपला इंधन पुरवठा डेपो लोणी काळभोरवरून पुन्हा मिरज येथे स्थलांतरित केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १९ मे : फलटण शहर व तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. वाढत्या दरांसोबतच इंधन कंपन्यांनी पेट्रोल पंप मालक आणि चालकांसाठी असणारे नियम अधिक कठोर केले आहेत. पंप चालकांना कंपन्यांकडून मिळणारी ‘क्रेडिट’ (उधारीची) सुविधा आता पूर्णपणे बंद करण्यात आली असून, इंधन पुरवठ्याबाबत (लोड) नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

ॲडव्हान्स पेमेंटशिवाय इंधनाचा ‘लोड’ नाही:

पेट्रोल पंप मालक आणि चालकांना पूर्वी इंधन कंपन्यांकडून जे क्रेडिट मिळत होते, ते आता तातडीने थांबवण्यात आले आहे. नवीन नियमानुसार, पंपावर उद्या जेवढे पेट्रोल किंवा डिझेल हवे आहे, त्याचे आजच दुपारी १२ वाजण्याच्या आत ॲडव्हान्स (आगाऊ) पेमेंट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेत पेमेंट केले, तरच दुसऱ्या दिवशी इंधनाचा पुरवठा (लोड) दिला जात आहे. यासोबतच, प्रत्येक पंपावर दररोज पेट्रोल व डिझेलची जेवढी विक्री होत आहे, केवळ त्याच प्रमाणात त्यांना इंधनाचा पुरवठा केला जात असल्याने पंप चालकांची कसरत वाढली आहे.

इंडियन ऑईलचा डेपो आता मिरजला:

फलटण शहर व तालुक्यात प्रामुख्याने इंडियन ऑईल (Indian Oil), हिंदुस्थान पेट्रोलियम (HP) आणि भारत पेट्रोलियम (BP) या शासकीय तेल कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. यापैकी बहुतांश कंपन्यांचा इंधन पुरवठा ‘लोणी काळभोर’ (पुणे) येथील डेपोमधून होत असतो.

परंतु, पुणे शहराचा वाढता ताण (लोड) लक्षात घेता, इंडियन ऑईल कंपनीने फलटण आणि परिसरातील पंपांसाठी आपला डेपो लोणी काळभोरवरून ‘मिरज’ येथे बदलला आहे. यापूर्वीही काही दिवसांसाठी कंपनीने असा निर्णय घेतला होता, त्यानंतर पुन्हा लोणी काळभोरवरून इंधन पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, वाढती मागणी आणि ताण पाहता आता पुन्हा एकदा मिरज डेपोतूनच फलटण तालुक्याला इंधन पुरवठा केला जात आहे.

फलटणमधील आजचे इंधनाचे दर:

दरवाढीनंतर आज फलटण शहरात इंधनाचे दर खालीलप्रमाणे नोंदवले गेले आहेत:

  • पेट्रोल: रु. 109.07 प्रति लिटर

  • डिझेल: रु. 95.53 प्रति लिटर

  • सीएनजी (CNG): रु. 95.50 प्रति किलो

या दरवाढीचा आणि कंपन्यांच्या नव्या धोरणांचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक आणि पेट्रोल पंप चालक अशा दोघांनाही बसत आहे.


Back to top button
Don`t copy text!