

जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून साताऱ्यातील ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ येथे इतिहास संशोधन व ऐतिहासिक वारसा संवर्धन संस्था, दुर्गनाथ ट्रेकर्स ग्रुप आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्थैर्य, सातारा, दि. १८ : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त साताऱ्यात ऐतिहासिक वारसा आणि इतिहासाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी जागतिक संग्रहालय दिनाचे महत्त्व स्पष्ट करत प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते आणि इतिहास संशोधक घनश्याम ढाणे यांनी “संग्रहालयापलीकडील संग्रहालय” या महत्त्वपूर्ण विषयावर प्रेझेंटेशन सादर केले. त्यांनी ऐतिहासिक वस्तू व छायाचित्रांचा कालनिहाय आढावा उपस्थितांसमोर मांडला आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित केली.
या अभ्यासपूर्ण कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तीकुंडे, इतिहास संशोधन व वारसा संवर्धन संस्थेचे सुभाष गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख अनिल जाधव, ‘आयर्न मॅन’ डॉ. दीपक निकम, शिवछत्रपती परिवाराचे मोहन शेलार, दैनिक ऐक्यचे गुरुदास अडागळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुशांत जाधव, तालुकाध्यक्ष संभाजी कदम, अभिव्यक्ता गुरुराज रसाळ, तसेच छत्रपती शिवाजी कॉलेजचे कोरडे सर व मासाळ सर आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी दुर्गनाथ ट्रेकर्सचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि इतिहासप्रेमींचे आभार मानले.
