
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचे फलटणमधील नियोजित स्थानक बारामतीला नेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सुप्रिया सुळे यांच्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ८ ऑगस्ट : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल ६००० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प फलटणमधून जाण्याऐवजी आता ‘मुंबई-पुणे-बारामती-हैदराबाद’ असा धावणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. यामुळे फलटण तालुक्याच्या हक्काचा प्रकल्प हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली असून, यावरून आता पुन्हा एकदा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रणजितदादांच्या प्रयत्नांना मिळाला होता ‘ग्रीन सिग्नल’
माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना फलटणचे सुपुत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला होता. ही बुलेट ट्रेन सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून, म्हणजेच फलटण तालुक्यातील ‘शिंदेवाडी’ येथून जावी आणि तिथे तिचे स्थानक (स्टेशन) व्हावे, यासाठी त्यांनी दिल्लीत प्रचंड ताकद लावली होती. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यशही आले होते आणि तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील (ग्रीन सिग्नल) दाखवला होता.
बारामतीसाठी सुप्रिया सुळेंचे प्रयत्न
सध्या रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढ्याचे विद्यमान खासदार नसल्याची संधी साधून, हा प्रकल्प फलटणमधील शिंदेवाडी येथून न जाता तो बारामतीमधून जावा, यासाठी बारामतीच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी याबाबत केंद्रीय पातळीवर आपले प्रयत्न वाढवले आहेत.
एकीकडे सुप्रिया सुळे बारामतीसाठी आक्रमक असताना, दुसरीकडे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची भूमिका मात्र पूर्णपणे गुलदस्त्यात आहे. हा प्रकल्प आपल्याच मतदारसंघातून जावा आणि नियोजित शिंदेवाडी येथेच बुलेट ट्रेनचे स्थानक व्हावे, यासाठी खासदार मोहिते-पाटील यांनी कोणताही प्रयत्न केल्याच्या बातम्या किंवा चर्चा कुठेही दिसून येत नाहीत.
नीरा देवघरच्या संघर्षाची होणार पुनरावृत्ती?
यापूर्वी नीरा-देवघरच्या पाण्याच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळे आणि तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीला मिळावे, यासाठी खासदार सुप्रिया सुळे प्रयत्नशील होत्या. परंतु, रणजितदादांनी आपले राजकीय वजन वापरून तो डाव हाणून पाडला. आज त्याच प्रयत्नांचे फळ म्हणून फलटण तालुक्यात नीरा-देवघर कालव्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
फलटणकरांचे लक्ष रणजितदादांच्या भूमिकेकडे
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज लोकसभेत नसले तरी, त्यांचे केंद्र सरकारमधील आणि दिल्लीतील राजकीय वजन किती भक्कम आहे, हे सर्वश्रुत आहे. आता येणाऱ्या काळात बुलेट ट्रेनच्या या प्रकल्पावरून नीरा देवघर प्रमाणेच सुप्रिया सुळे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? आणि रणजितदादा आपले दिल्लीतील राजकीय वजन वापरून बुलेट ट्रेनचा थांबा माढा लोकसभा मतदारसंघात, पर्यायाने फलटण तालुक्यातील शिंदेवाडीतच खेचून आणणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून, संपूर्ण फलटणकरांच्या आशा पुन्हा एकदा रणजितदादांवरच लागून राहिल्या आहेत.
