
दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२६ | सातारा |
केळघर येथील एका झेरॉक्स सेंटरच्या मालकाला त्याच्या दुकानातील पेटीएम मशीन चेकिंग करून देतो, असा बहाणा करून ८.२५ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात धनवंत बाळकृष्ण सल्लक, रा. केळघर, ता. जावली, जि. सातारा याने पेटीएमवरून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात झेरॉक्स सेंटर मालकाने दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांचा मेढा येथे झेरॉक्स व्यवसाय असून त्यांच्याकडे असलेल्या पेटीएम मशीनचे चेकिंग करण्यासाठी धनवंत बाळकृष्ण सल्लक हा आला असता त्याने भोसले यांच्या पेटीएम मशीनवरून ऑनलाइन ८ लाख २५ हजार ६४० रुपयांचे कर्ज मोबा. ९२८४१९७६६४ वर घेऊन भोसले यांची दि. १५ मार्च ते दि. ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये फसवणूक केल्याची तक्रार भोसले यांनी दिली आहे. या प्रकरणी धनंजय सल्लक यांच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा तपास पीएसआय शिंगटे करत आहेत.
जावली तालुक्यात पेटीएम, फोन पे मशीन चेकिंगकरिता येऊन पेटीएम, फोन पे खात्यावरून ऑनलाइन कर्ज काढून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास मेढा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, असे आवाहन स.पो.नि. सुधीर पाटील यांनी केले आहे.