जिल्ह्यातील १९ हजार शेतकर्‍यांना मिळाली कर्जमाफी; १४२ कोटी जमा

दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२६ | सातारा |
राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील १४२ कोटी रुपयांची रक्कम सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा झाली आहे. १९ हजार ४८ शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांवर १४२ कोटी ७ लाख ३९ हजार २८४ रुपये जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शुक्रवारी दिली.

कर्जमुक्ती योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक योगदान दिले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १६ हजार ९९५ कर्ज खात्यांवर एकूण १२२ कोटी १ लाख ५९ हजार ८४८ रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यामुळे बँकेच्या सभासद शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. कर्जमाफीमुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्यास मदत होईल, अशा भावना शेतकन्यांनी व्यक्त केल्या.

सहकारी बँकांसोबतच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या माध्यमातूनही शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती, तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा व तालुका स्तरावरील तहसीलदार आणि तालुका सहायक निबंधक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.

व्यापारी बँकांमधील २ हजार ६३ कर्ज खात्यांवर ११ कोटी ९७ लाख ७२ हजार ४३६ रुपये जमा झाले. मयत शेतकर्‍यांच्या वारसांनी त्यांची वारस नोंद महसुली दप्तरावर (७/१२) करून घेण्यासाठी महसूल विभागाकडे वारसाच्या नावांसह अर्ज करावेत.

शासनाकडून प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार जिल्ह्यातील सुमारे ६ हजार शेतकर्‍यांनी अद्यापही त्यांची ई- केवायसी पूर्ण करून आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा सर्व शेतकर्‍यांनी त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक तत्काळ काढून घ्यावा. आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!