३४ वर्षांनी भरला दहावी ‘फ’चा वर्ग

मुधोजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
मुधोजी हायस्कूल सन १९८८-१९८९ बॅचच्या इयत्ता दहावी, तुकडी ‘फ’च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.

यानिमित्ताने शालेय जीवनातील खास मित्र-मैत्रीणी तब्बल ३४ वर्षांनी एकमेकांना भेटत होते. तिच शाळा, तेच जुने मित्र-मैत्रीणी, तोच वर्ग, तोच बॅच, शेजारी बसणारे सवंगडीही तेच आणि तेच शिक्षक, यामुळे भारावलेल्या वातावरणात माजी विद्यार्थ्यांनी खास स्वत:साठी संपूर्ण दिवस आनंदात घालविला.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत मुनीर तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन विश्वास घनवट यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले.

त्यावेळचे शिक्षक चोरमले सर यांचे स्वागत वैशाली कुलकर्णी हिच्या हस्ते तर माने सरांचे स्वागत धनाजी भगत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबाचे फुल व पेढे देऊन करण्यात आले. त्यानंतर चोरमले सर व माने सर यांनी पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले. फक्त यावेळी हातात खडू, डस्टर, पुस्तक असे काही नव्हते; परंतु अनुभवाची फार मोठी शिदोरी त्यांच्याकडे होती. तसेच यावेळी सतीश भांडवलकर, सतीश जामदार, जावेद शेख, शुभांगी कोरडे, यास्मीन पठाण, कल्पना दीक्षित या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुनीर तांबोळी यांनी सर्वांचे आभार मानले.

त्यानंतर सर्वजण कोळकी येथील हॉटेल रेड स्टोन येथे रवाना झाले. तेथे सर्वांनी खूप मौजमस्ती, डान्स, मनोरंजन, गप्पा याप्रकारे एकमेकांबरोबर वेळ व्यतित करून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. सर्वांनी पुन्हा भेटूया, असा आशावाद व्यक्त करून निरोप घेतला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुनीर तांबोळी, महंमद शेख, धनाजी भगत, वैशाली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!