मुधोजी महाविद्यालयात विनाहेल्मेट प्रवेशास बंदी; उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सक्तीचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२३ | फलटण |
फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात यापुढे विनाहेल्मेट असणार्‍या दुचाकीस्वारांना प्रवेश दिला जाणार नाही. तशा मार्गदर्शक सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा यांनी मुधोजी प्रशासनास दिल्या आहेत. त्यामुळे विनाहेल्मेट जे कोणी महाविद्यालयात परिसरात दिसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नुकतेच मुधोजी प्रशासनास हेल्मेट सक्तीविषयी सूचना पत्र देण्यात आले आहे.

या सूचना पत्रात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील सन २०२२ व २०२३ मध्ये घडलेल्या अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, या वर्षांमध्ये घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. सदर अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पादचार्‍यांचे आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या द़ृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे.

वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, हे रस्ता सुरक्षेच्या द़ृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे व बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनचालक हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

मोटार वाहन कायद्याप्रमाणे हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणार्‍या अथवा त्यास संमती देणार्‍या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे. या कायदा कलमाप्रमाणे विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयास सूचित करण्यात येत आहे की, आपल्या कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा. तसेच याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेज तपासून अशा विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची यादी आपण या कार्यालयात सादर करावी. त्यामुळे त्यांच्या कारवाई करण्यात येईल.


Back to top button
Don`t copy text!