‘एमएसइबी’च्या डीपी फोडून तांबे चोरी करणारी टोळी जेरबंद


 

स्थैर्य, सातारा, दि. १४ : जिल्ह्यातील सातारा व कोरेगाव तालुक्यातील ‘एमएसइबी’च्या डीपी फोडून तांबे चोरी करणारी टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. संबंधितांकडून 14 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन जयसिंग फाळके वय 40, सुनिल माणिकराव शिरतोडे वय 21, गणेश बाजीराव शिरतोडे वय 34, विक्रम राजाराम माने वय 35, ऋषीकेश विलास बनसोडे वय 21, धीरज अनिल सावंत वय 21 सर्व रा. पाडळी सातारारोड, ता. कोरेगाव आणि सोमनाथ नयनसिंग सावंत वय 35 शिवनगर कोडोली सातारा अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जिल्ह्यातील सातारा व कोरेगाव तालुक्यातील ‘एमएसइबी’च्या डीपी फोडून त्यातील तांबे चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना डीपी चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची नेमणूक केली होती. दि. 9 डिसेंबर 2020 रोजी रात्री 8 वाजता व 10 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 7च्या दरम्यान अंबवडे सं. (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीतील कॅनॉलजवळील डीपी स्ट्रक्चरवरील डेपो तोडून त्यामधील ऑईल सांडून त्यातील 70 हजार किंमतीची 70 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत कोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

संबंधित गुन्ह्यातील आरोपींबाबत माहिती मिळताच असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने सातारारोड परिसरात सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना 11 डिसेंबर 2020 रोजी रात्री गुन्ह्यात अटक करून त्यांची न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. 

पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान यातील आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सातारा तसेच कोरेगाव तालुक्यातील ‘एमएसइबी’ डीपी चोरीच्या तब्बल 20 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून 13 लाखांचे एकूण 1300 किलो वजनाचे तांबे जप्त करण्यात आलेले आहे. याशिवाय आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली 1 सॅन्ट्रो कार, 2 मोटर सायकल व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे असा एकूण 14 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, अमलदार उत्तम दबडे, जोतिराम बर्गे, प्रविण शिंदे , अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष, शरद बेबले, नितीन गोगावले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, रवी वाघमारे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, गणेश कापरे, अमित सपकाळ, निलेश काटकर, राजू ननावरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, केतन शिदे, चालक संजय जाधव, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!