

छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या स्टेटसवरून अनिकेत घाडगे याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अजीम आत्तार याला फलटण शहर पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. १७ मे : १४ मे रोजी फलटण शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ठेवलेल्या स्टेटसवरून अनिकेत घाडगे या युवकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना गुंगारा देत शुक्रवार पेठ, मोहल्ला गल्ली येथे लपून बसलेल्या अजीम आत्तार याच्या फलटण शहर पोलिसांच्या विशेष पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
शहरात निर्माण झाली होती दहशत; हिंदू समाज झाला होता आक्रमक:
१४ मे रोजी स्टेटसच्या कारणावरून असीम अत्तार याने अनिकेत घाडगे याला फोनवरून व त्याच्या राहत्या घरी जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे शहरात काही काळ दहशत निर्माण झाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते आणि फलटण शहरातील सकल हिंदू समाज आक्रमक झाला होता. आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी हिंदू समाज बांधवांकडून करण्यात आली होती.
शुक्रवार पेठेतून ठोकल्या बेड्या:
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अजीम आत्तार हा पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. मात्र, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याने एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाला आरोपी शुक्रवार पेठेतील मोहल्ला गल्लीत लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अत्यंत शिताफीने अजीम आत्तार याला अटक केली.
‘या’ अधिकाऱ्यांनी केली कारवाई:
या विशेष कारवाईमध्ये डीवायएसपी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काळे, अधिकारी दिनेश शिंदे, टिके, महेश जगदाळे आणि जयपाल यादव यांनी भाग घेतला. पोलिसांच्या या तत्पर आणि धडक कारवाईमुळे तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदत झाली असून, नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे समाधान व्यक्त केले जात आहे.
