आई विश्वाचे दर्शन घडविते – प्राचार्य रविंद्र येवले

आदर्श माता स्व. गजराबाई आवळे यांच्या स्मरणार्थ पांगरी येथे ‘आदर्श आई’ पुरस्कार वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ एप्रिल २०२४ | फलटण |
पांगरी (ता. माण) येथे आदर्श माता स्व. गजराबाई नारायण आवळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नऊ आदर्श आई व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

पांगरी येथील कै. नारायण गेणू आवळे शैक्षणिक संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. लक्ष्मी सोनबा तांबे, सौ. पार्वती काकासाहेब गायकवाड, सौ. सुलोचना जयवंत काळे, सौ. छलाबाई तात्याबा गायकवाड, रुक्मिणी आण्णा दडस, इंदूबाई बाबुराव गायकवाड, लक्ष्मी यशवंत खरात, सुमन तुकाराम गायकवाड, बायडाबाई आप्पा दडस यांना ‘आदर्श आई’ पुरस्कार तसेच प्रा. डॉ. अनिल दडस, ऋतुजा माने, डॉ. प्राजक्ता दडस, डॉ. स्वाती खरात, कु. तन्वी गायकवाड, कु. आरती दडस, जुईली राऊत यांचा विशेष सत्कार प्राचार्य रविंद्र येवले, पोलिस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे, प्राचार्य डॉ. नानासाहेब लांडगे, शरद पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्राचार्य रविंद्र येवले म्हणाले की, आधुनिकतेचा बुरखा पांघरलेल्या जगात आईचे महत्त्व फार लाखमोलाचे आहे. आई विश्वाचे दर्शन घडवते. त्यामुळे तिला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, तीच आपल्या आयुष्याला आकार देणारी माऊली असते. तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आवळे कुटुंबाने ‘आदर्श आई’ पुरस्कार व गुणवंतांचा सत्कार हा उपक्रम राबवून समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे. समाजातील दुर्लक्षित अन् कष्टाने कुटुंब उभे करून मुलांना चांगले शिक्षण व संस्कार दिले अशा आईंचा सत्कार ही गौरवास्पद बाब आहे.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले की, या मातांना सलाम केला पाहिजे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी कष्ट करून नवा भारत व त्यातील समाज निकोप निर्माण करण्यासाठी हातभार लावला आहे. ग्रामीण भागातील हा आगळावेगळा उपक्रम सर्व समाजासाठी दिशादर्शक आहे. असे कार्यक्रम होणे फार गरजेचे आहे. आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम संस्कारक्षम नवसमाज निर्माण करण्यास निश्चितच उपयोगी पडेल.

यावेळी प्राचार्य डॉ. नानासाहेब लांडगे, प्रा. डॉ. अनिल दडस यांनी कृतज्ञतापर विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच दिलीप आवळे, प्रा. सौ. सुरेखा आवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!