जनतेला फसवायचे काम आमदार रामराजे करतात : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । फलटण । केंद्रीय जलशक्ती आयोगाकडून करण्यात आलेल्या जल जीवन मिशनच्या फलटण तालुक्यातील गावोगावी जावुन उद्घाटनांची कामे आमदार रामराजे करत करत असून सर्वसामान्य फलटणकर जनतेला फसवायचे काम ते करत आहेत, असा टोला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला.

केंद्रीय जलशक्ती आयोगाच्या माध्यमातून जलजीवन मिशनच्या आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे बोलत होते. यावेळी फलटण तालुक्याचे युवा नेते धनंजय साळुंखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर जल ही संकल्पना सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या पद्धतीने राबवली जात आहे, याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेली हर घर जल योजना राबवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. राज्य सरकार व केंद्र सरकार मधला दुवा बनून आगामी काळात राहिलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे काम करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये केंद्रीय जल जीवन मिशनचे अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे उद्घाटने आमदार रामराजे करत असून यामध्ये त्यांचा काडीमात्र संबंध नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येणारे योजनांचे उद्घाटन सुद्धा गावोगावी जाऊन आमदार रामराजे करत आहेत, असा टोलाही यावेळी खासदार रणजितसिंह यांनी लगावला.

केंद्र सरकारमधील केंद्रीय जलजीवन मिशनच्या पार्लिमेंट्री बोर्डाचा मी स्वतः सदस्य असल्यामुळे या केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या योजनांचा आढावा सातारा जिल्ह्यासाठी मी स्वतः घेत आहे. आगामी काळामध्ये ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आता येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सदरील योजना प्रत्येक गरजू व्यक्तीला मिळेल, अशी ग्वाही सुद्धा यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!