दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जी स्वप्ने उराशी बाळगून स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले तर कोणी कारावास भोगला. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे काम आत्ताच्या पिढीने करावे हीच खरी शहिद स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन व रहिमतपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील माने यांनी केले. –
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त तसेच प्रतिसरकारच्या रहिमतपुर गटाचे प्रमुख क्रांतीवीर सोपानराव घोरपडे यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुनील माने बोलत होते. अध्यक्षस्थानी रहिमतपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे होते. यावेळी ९ ऑगस्ट १९४२ रोजी वडूज तहसीलदार कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्याप्रसंगी इंग्रज पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले लोणंद येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णा बंडू सापते यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सुनील माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विचारपीठावर स्वातंत्र्यसैनिक अण्णा सापते , रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने माजी नगराध्यक्ष व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने , प्रा. भानुदास भोसले , भागवत घाडगे , विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय मांडके , स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय देशपांडे , अस्लम तडसरकर , स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे यांचे नातू राजेश घोरपडे हे होते. क्रांतिवीर सोपानराव घोरपडे यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात समाज बांधणीचे व समाज ऊभारणीचे काम केले . लोकशाही , समाजवाद समता , बंधुता व यासाठी तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला याचा गौरव करून सुनील माने यांनी रहिमतपूर नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी निमित्त रहिमतपूर मधील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृत्यर्थ स्मृतिस्तंभ उभारावा असे आवाहन नगराध्यक्ष आनंदा कोरे यांना केले . अध्यक्षीय भाषणात रहिमतपूर चे नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी सोपानराव घोरपडे यांचे विचार व निष्ठा ही वाखाणण्याजोगी होती. तोच विचार पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे असे सांगितले.
यावेळी संपतराव माने , प्रा भानुदास भोसले , अस्लम तडसरकर यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात विजय मांडके यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. क्रांतिवीर सोपानराव घोरपडे यांच्या कार्याचा आढावा घेतानाच स्वातंत्र्यसैनिक अण्णा बंडू सापते यांच्या विषयीची माहिती उपस्थितांना दिली.
सूत्रसंचालन विकास पवार यांनी केले . आभार हंबीरराव माने यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रांतीवीर सोपानराव घोरपडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राज्य सहकारी बँकेचे माजी अधिकारी नारायणराव पाटील , संतोष पाटील ( पाल) , वासुदेव माने , नंदकुमार माने , विक्रमसिंह माने , विद्याधर बाजारे , साहेबराव माने , बाबुराव शिंदे , राजेंद्र शेलार आदी मान्यवरांसह बहुसंख्येने स्वातंत्र्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.