
थेट WhatsApp वर मिळवा
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा असलेले स्वस्त रिचार्ज प्लॅन देण्याचे कडक आदेश दिले आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. २३ सप्टेंबर : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या सर्व टेलिकॉम कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि मेसेजची सुविधा असलेले स्वतंत्र आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ज्या ग्राहकांना इंटरनेट डेटाची गरज नाही, त्यांची नको असलेल्या डेटा पॅकच्या खर्चातून सुटका होणार आहे.
अनावश्यक डेटा पॅकच्या खर्चातून ग्राहकांची सुटका
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश प्लॅनमध्ये कॉलिंगसोबत इंटरनेट डेटाचा समावेश असतो. त्यामुळे केवळ फोनवरून बोलण्यासाठी किंवा मेसेज करण्यासाठी मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना नाईलाजाने महागडे रिचार्ज करावे लागत होते. विशेषतः फीचर फोन वापरणारे ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील ग्राहक आणि बँकेच्या कामासाठी दुसरं सिम वापरणाऱ्यांना या सक्तीचा मोठा आर्थिक फटका बसत होता. ट्रायच्या या हस्तक्षेपामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कमी खर्चात रिचार्ज पर्याय निवडता येणार आहे.
दरमहा एकाच तारखेला रिन्यू होणार प्लॅन
ट्रायने टेलिकॉम कंपन्यांसाठी ३० दिवस किंवा त्याहून कमी कालावधीचे विविध व्हॉइस-ओन्ली प्लॅन देणे सक्तीचे केले आहे. याशिवाय दरमहा एकाच ठरावीक तारखेला आपोआप नूतनीकरण होणारा किमान एक व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन देणेही आवश्यक आहे. या निर्णयामुळे ग्राहकांची २८ दिवसांच्या रिचार्ज सायकलच्या कचाट्यातून सुटका होणार असून सर्वसामान्यांचे मोबाईल बिल लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे.