
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण व कऱ्हाडमधील प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी साखळवाडी आणि उंब्रज येथे अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २३ सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे नवीन ‘अपर तहसीलदार कार्यालय’ सुरू करण्यास महसूल विभागाने नुकतीच अधिकृत मंजुरी दिली आहे.
साखरवाडीत अपर तहसीलदार कार्यालय सुरू होण्याचा शासन आदेश निर्गमित झाल्याबद्दल, साखरवाडी जिल्हा परिषद गटाच्या वतीने फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी रणजितदादांचे विशेष आभार मानले आहेत.
या नवीन प्रशासकीय रचनेनुसार फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे अपर तहसीलदार कार्यालय स्वतंत्रपणे कार्यान्वित केले जाणार आहे. या नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात होळ, तरडगाव आणि आदर्की बुद्रुक या तीन मोठ्या महसूल मंडळांचा समावेश असणार आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या महसुली कामांसाठी थेट फलटणला जाण्याची गरज भासणार नाही. तर, फलटणच्या मूळ तहसीलदार कार्यालयाकडे फलटण, कोळकी, बरड, आसू, राजाळे, गिरवी आणि वाठार निंबाळकर ही सात महसूल मंडळे कायम राहतील.
याच निर्णयाचा भाग म्हणून कऱ्हाड तालुक्यात उंब्रज येथेही अपर तहसीलदार कार्यालयास मंजुरी मिळाली असून, याअंतर्गत उंब्रज, मसूर, कवठे आणि इंदोली या चार महसूल मंडळांचा कारभार चालणार आहे. मूळ कऱ्हाड तहसीलदार कार्यालयाकडे कऱ्हाड, सैदापूर, मलकापूर, कोळे, काळे, सुपणे, कापर्डे हवेली, येळगाव, शेणोली आणि उंडाळे या दहा मंडळांची जबाबदारी राहील.
शासनाच्या आदेशानुसार, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही दोन्ही नवीन कार्यालये सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध जागेत तातडीने सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर कायमस्वरूपी जागेचा शोध घेऊन नवीन सुसज्ज इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे अवघ्या पंधरा दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या या दूरदृष्टीच्या प्रयत्नांमुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असून, महसुली सेवा अधिक जलद मिळण्यास मोठी मदत होणार असल्याने साखरवाडी परिसरात मोठ्या समाधानाचे वातावरण आहे.
