वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना


दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । सोलापूर । सोलापूरसह अन्य चार जिल्ह्यांना यलो ॲलर्ट देण्यात आला असून, पुढील चार दिवस गारपिटीसह अतिवृष्टी होईल, असा हवामान विभागाने इशारा दिला आहे. वीज पडून जीवित हानी होण्याच्या घटना घडत असतात, या पार्श्वभूमिवर वादळी वीज पडून होणाऱ्या दुर्देवी मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेणारा लेख…

वीज पडणे ही नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य, पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते.

मान्सुन सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमौसमी पावसाच्या काळात वीज कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. पाऊस पडण्याच्या आधी आकाशात ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरु असते. त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेत मजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडतात.

एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तिंचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे, जेणेकरून मनुष्य, पशु आणि वित्तहानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. ज्या लोकांनी वीज कोसळणे अनुभवले आहे त्यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले कि अचानक वादळी वातावरण निर्माण झाल्यावर मोठ्या आणि उंच झाडाखाली आश्रयास उभे असताना हा धोका जास्त असतो. वीज उंचीच्या ठिकाणी कोसळते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे जे लोक वीज चमकत असताना झाडाच्या आश्रयाला होते. वीज पडल्यामुळे ते मृत्युमुखी पडले अथवा जखमी होतात.

सर्व नागरिकांनी बचावासाठी सूचनांचे पालन करावे आणि स्मार्ट फोन असल्यास त्यामध्ये भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था पुणे (IITM) व भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले दामिनी अप इंस्टॉल करावे. तसेच, बचावासाठी खालील सूचनांचे पालन करावे.

अचानक आलेल्या वादळात घ्यायची काळजी

छत्र्या, कोयते, सुऱ्या, गोल्फ खेळण्याची काठी अशा धातूच्या वस्तूंची जवळ ठेवणे टाळा. विशेषतः त्या वस्तू आपल्या उंचीवर असतील तर, वीज पडताना पाहणे किंवा ऐकणे धोकादायक असते.

अचानक आलेल्या वादळाच्या वेळी झाडाजवळ असाल, तरी शरीराची रचना पुढीलप्रमाणे असावी. जमिनीवर बसा. दोन्ही पावले जमिनीवर ठेवा, पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडा आणि त्याभोवती हातांचा विळखा घाला. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरा. घराबाहेर असताना विजेपासून होणारा धोका कमी करण्यासाठी जर रिकाम्या  जागेत असाल तर त्वरीत आसरा शोधा

जर वीज पडली तर

तर तुमच्या आसपास अथवा कोणा व्यक्तिवर वीज पडली तर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवा. बाधित व्यक्तिवर प्राथमिक उपचार करताना या गोष्टींचा विचार करा.

श्वासोच्छवास – जर थांबला असेल, तर त्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तिचा नैसर्गिक  श्वासोच्छवास सुरू होण्यास मदत होईल.

हृदयाचे ठोके – थांबले असल्यास सीपीआर (CPR) चा उपयोग करावा.

नाडीचा ठोका – चालू असेल आणि श्वासोच्छवास चालू असेल, तर इतर काही जखमा अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत नोंद करा. दृष्टी ठीक आहे, नाव ऐकू येत आहे ना व इतर हालचाली याची नोंद घ्या.

विजेच्या धोक्यापासून स्वत: सुरक्षित राहा व दूसऱ्यांचा बचाव करा.

मेघ गर्जना, वीज, वादळ होत असताना हे करा आणि हे करू नका

तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरित आसरा शोधा, इमारत हा सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खड्डा किंवा खिंडी सारख्या भागात आश्रय घ्या. झाडे यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे विजेला स्वतः कडे आकर्षित करतात.

तुम्हाला आसरा मिळाला नाही तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जमिनीवर वाका किंवा वाकून बसा.

घरातच राहा किंवा बाहेर असाल, तर घरी जा. जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा.

लक्षात ठेवा. विजेचा प्रकाश आणि आवाज यातील अंतर जितके सेकंद असेल, त्याचा तीनने भागाकार केला असता ज्या ठिकाणी वीज कोसळली तिथेपर्यंतचे अंतर किलोमोटरमध्ये अंदाजे कळू शकते.

जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा. धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचेनळ असलेल्या जागा आणि टेलिफोन

पाण्यातून तात्काळ बाहेर या, छोट्या नावेतून पाण्यातून जात असाल तर काठावर बाहेर या.

जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्या वर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

काय करू नये?

विद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. जसे की – हेअर ड्रायर, विद्युत टूथ ब्रश किंवा विद्युत रेझर, जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

वादळात टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधुन वाहू शकते.

बाहेर असतांना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.

कोसळणाऱ्या विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी तपशीलवार माहिती

विजा चमकत असताना सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बंदिस्त इमारत, सहली साठीचे तंबू किंवा पडवी नाही. दुसरे सुरक्षित ठिकाण म्हणजे धातूचे बंदिस्त वाहन. जसे चारचाकी गाड़ी, ट्रक, व्हॅन इ. पण मोटरसायकल किंवा हलक्या छताची वाहने नाहीत.

सुरक्षित इमारत म्हणजे ज्याला भिंती, छप्पर, फरशी आहे, जसे की घर, शाळा, कार्यालयाची इमारत.

भक्कम छताची वाहने, जसे की चार चाकी गाडी, एस.यू.व्ही., बस. जर तुम्ही तुमच्या वाहनात आसरा घेतला असेल, तर दारे-खिडक्या पूर्ण बंद असल्याची खात्री करा. धातू असलेल्या वाहनाच्या भागाला स्पर्श करू नका.

जेव्हा डोक्यावर गडद काळे ढग जमू लागतात , पहिल्यांदा वादळाचा आवाज येतो. तेव्हा सुरक्षित आसरा शोधा,

उंच एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. झाडामुळे तुम्ही कदाचित कोरडे राहाल, पण विजेमुळे होणाऱ्या हानीची शक्यता तिथेच जास्त आहे. पावसामुळे तुमचा मृत्यू होणार नाही, पण विजेमुळे होऊ शकेल. अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.

जर तुम्हाला खरोखरच सुरक्षित इमारत किंवा वाहन मिळाले नाही, तर पुढील उपायांचा अवलंब करा

पुलाखाली उभे राहून वादळ जाण्याची वाट पहा. पुलाच्या लोखंडी तुळ्या कमानींना स्पर्श करू नका, तुमच्या दुचाकीपासून दूर अंतरावर थांबा, शक्यतो कोरड्या जागेवर थांबा, पूल हा स्थापत्य शास्त्रानुसार काळजीपूर्वक बांधलेला असतो. पूल जरी जमिनी पासून उंचावर असला आणि जर त्यावर वीज कोसळली, तरी विजेचा प्रवाह सुरक्षितपणे जमिनीत जातो.

एखादा पूल शोधा, पाण्यापासून दूर राहा. धातूच्या वस्तूंपासून दूर राहा. जर पुलाखाली उभे असाल, तर पाण्याच्या सतत वाढणाऱ्या पातळीची दखल घ्या.

जर उच्च दाबाच्या तारा रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असतील तर ज्या उंच मनोऱ्यांना ह्या तारा जोडल्या असतील त्याच्या खूप जवळ जाऊ नका. कमीत कमी ५० फूट अंतर सोडा जर वीज ह्या तारांवर किंवा मनोऱ्यावर कोसळली, तर प्रवाह सुरक्षितपणे या तारातून जमिनीत या अशीच त्यांची रचना असते.

वादळ होत असतांना टाळावीत अशी ठिकाणे व घटना

“वीज ही नेहमी कोणत्याही ठिकाणच्या सर्वात उंच जागेवर कोसळते. शक्यतो धातूच्या वस्तूवर-जेवढी मोठी धातूची वस्तू तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त. शक्यतो मोकळ्या जागेवरील किंवा डोंगराच्या उंचावरील भागात असलेल्या एकाकी झाडाचा आसरा घेणे टाळा. झाडाच्या पसरलेल्या फांद्यांखाली उभे राहणे, हे तर जास्तच धोकादायक, सर्वच प्रकारची झाडे धोकादायक असतात. जेवढे झाड उंच, तेवढा धोका अधिक. एकाकी झाडा एवढाच काही झाडांचा छोटा समूहही तेवढाच धोकादायक असतो. झाडाजवळ उभे राहिल्याने झाडावरील विजेचा झोत हा शेवटी जवळ असलेल्या व्यक्तीकडेच येतो.

हे सुध्दा धोकादायक आहे

जंगलासभोवती असलेली मोठी झाडे.

मोकळ्या जागेवरील असंरक्षित वास्तू. जसे की- छोटी चर्च, धान्याची कोठारे, वाळलेल्या गवताच्या गंजी, लाकडी गाड्या, निरीक्षण मनोरे, उंचवटे असलेल्या जागा. झोपडया आणि इतर आसरे.

धातूचे कोणतेही भाग नसलेल्या लाकडाच्या ज्यात पाण्याचे धातूचे नळ आहेत, त्या नळांना स्पर्श करणे टाळा.

झेंडा उभा करायचा खांब, दुरदर्शन अँटिना, नळ किया धातूची उंची कायम स्वरूपी वास्तु ह्यांच्या जवळ जाऊ नका.

तळे व पाण्याचे तलाव, बहुधा ही ठिकाणे मदत मिळण्यास दुरापास्त असतात. विशेषतः साठलेल्या पाण्यात तळ्यात तरंगणारी होडी

गोल्फ कोर्स आणि इतर मैदाने इथे विजा कोसळण्याची शक्यता असते.

उंच सुळके व पर्वतांच्या कडा, डोंगर माथा, दरीपेक्षा डोंगर माथ्यावर जास्त विजा कोसळतात.

विजेपासून संरक्षित नसलेल्या जागा –  कायमस्वरूपी धातूच्या तारांची बनवलेली कुंपणे, आधार घेण्यासाठी लावलेल्या धातूच्या नळ्या व धातूची इतर मोठी बांधकामे, सायकल, मोटरसायकल उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा चालवणे,धातूची हत्यारे जसे की पहार, कुदळ, कुऱ्हाड, खुपे, छत्र्या, धातूचे झोपाळे, बागेत बसायच्या धातूच्या खुर्चा, बाक इ.

उघड्या मैदानावर किंवा एखाद्या असंरक्षित लहान खोलीत लोकांचे एकत्र जमणे.

मोटारीच्या बाहेर उभे राहणे, मोटारीतून बाहेर डोकावणे किंवा मोटारीला रेलून उभे राहणे.

रोड रोलर किंवा धातूची तत्सम वाहने यांचे सानिध्य टाळावे.

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष,

जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर


Back to top button
Don`t copy text!