“महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीत, ते मख्खमंत्री आहेत” – संजय राऊत


दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । मुंबई । अमृता फडणवीस यांना धमकी दिल्याप्रकरणी काल एका तरूणीला अटक करण्यात आली. तिचे वडील कुख्यात फरार बुकी व उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी त्या तरूणीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याची घटना घडली. घडलेल्या प्रकारानंतर मलबारहिल पोलिसांनी गुरुवारी जयसिंघानी याची मुलगी अनिष्काला बेड्या ठोकल्या. या प्रकरणावर आज शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘मख्खमंत्री’ असा करत त्यांची खिल्ली उडवली.

“राज्यात सध्या जो काही प्रकार सुरू आहे त्यावरून असे दिसून येते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोणावरच वचक नाही. कारण या राज्याला मुख्यमंत्री नाहीच, या राज्याला एक ‘मख्खमंत्री’ आहे. राज्यात सगळं मख्खपणे चाललं आहे. मुख्यमंत्री असते तर त्यांनी अँक्टिव्हपणे काम केले असते. पण ते मख्खमंत्री आहेत. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवताना दिसत आहेत. मुख्यमंत्री केवळ ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याच्या कामात गुंतले आहेत,” असे म्हणत राऊतांनी शिंदेंना खोचक टोला लगावला.

अमृता फडणवीस प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

“प्रकरण सध्या न्यायालयात आहे आणि त्यावर तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणं योग्य होणार नाही. काल सभागृहात काय झालं, मविआमध्ये काय झालं हे सगळं सोडून द्या. आता तुमच्या सरकारच्या काळात काय होतंय त्याकडे आधी बघा. आमच्याकडे बोटं करत असताना काही बोटं स्वत:कडेही आहेत हे लक्षात ठेवा. मला तोंड उघडायला लावू नका. हा कुटुंबाचा विषय आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचत नाही. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार असून ते मी कायम पाळतो,” असे संजय राऊत म्हणाले.

आम्हीही या प्रकरणाचा तपास करू शकतो, पण…

“ब्लॅकमेलचं प्रकरण काय आहे याचा पोलिसांनी तपास करावा. आम्हीही तपास करू शकतो पण आम्हाला जास्त बोलायचं नाही. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहावं आणि तपास करावा. कारण महाराष्ट्रात एखाद्या महिलेला ब्लॅकमेल केलं जात असेल तर ते गंभीर आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या-उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असोत की सामन्या महिला असो, असा प्रकार घडणं निंदनीय आहे,” असा स्पष्ट विचार त्यांनी मांडला.


Back to top button
Don`t copy text!