
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व निपुण भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर माता-पालक मेळाव्यातून घर आणि शाळेचा संवाद वाढवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर देण्यात येणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि केंद्र शासनाच्या ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाला प्राधान्य देण्यात आले आहे. याच अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये शाळा आणि माता-पालक यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ व्यापक स्वरूपात राबवण्याची गरज असल्याचे शिक्षणतज्ज्ञ तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अनिलकुमार कदम यांनी आपल्या शैक्षणिक लेखातून स्पष्ट केले आहे.
घर आणि शाळेतील समन्वयाला महत्त्व
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शाळेबरोबरच कुटुंब आणि विशेषतः आईचा सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, वर्तन, अध्ययनातील अडचणी, वाचनाची सवय, घरातील अभ्यासाचे वातावरण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, सुरक्षितता आणि बालहक्क अशा विविध विषयांवर माता-पालक आणि शिक्षकांमध्ये नियमित संवाद होणे आवश्यक असल्याचे कदम यांनी नमूद केले आहे.
मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना आणि डिजिटल शिक्षणासह शिक्षण विभागाच्या उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणूनही या मेळाव्याकडे पाहिले पाहिजे. मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांतील जडणघडणीची पायाभरणी घरातून होत असल्याने पालकांनी त्यांच्या गुणवत्ता विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
‘रोज २० मिनिटे मुलांसोबत’ उपक्रमावर भर
माता-पालकांनी दररोज किमान २० मिनिटे मुलांसोबत घालवून शाळेतील अध्ययन-अध्यापन, वाचन-लेखन, गोष्टींची पुस्तके, अभ्यास, आरोग्यदायी सवयी तसेच आवडते आणि अडचणीचे विषय याबाबत संवाद साधावा. मुलांचे म्हणणे ऐकून घेण्याबरोबरच खेळ आणि कृतीच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी निर्माण करण्यावर भर देण्याची आवश्यकता कदम यांनी मांडली आहे.
निपुण महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत माता-पालक गटांचा या मेळाव्यांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घ्यावा. प्राथमिक स्तरावर वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया यांची खेळ व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पालकांना माहिती द्यावी. विद्यार्थ्यांच्या कमतरतांवर नकारात्मक चर्चा करण्याऐवजी त्यांच्या चांगल्या बाबी सांगून सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सुचवले आहे.
वर्षातून चार वेळा मेळाव्याचे नियोजन
शैक्षणिक वर्षात जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी असे चार माता-पालक शैक्षणिक मेळावे आयोजित करण्याचे नियोजन आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळास्तरावर या मेळाव्यांचे आयोजन करण्याबाबत सूचना असल्याचे कदम यांनी लेखात नमूद केले आहे.
मेळाव्याची प्राथमिक जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर राहणार आहे. मातांना वैयक्तिक फोन किंवा प्रत्यक्ष भेटीतून निमंत्रित करणे, संवादासाठी साधी व स्थानिक भाषा वापरणे, मातांना अनुभव मांडण्याची संधी देणे आणि सोबत येणाऱ्या लहान मुलांसाठी खेळण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे अशा बाबींची काळजी घेण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली आहे.
मेळावा केवळ औपचारिक सभा ठरू नये
माता-पालक मेळावा एकतर्फी सूचना देणारी औपचारिक सभा न राहता शिक्षक आणि पालक यांच्यातील संवादाचे प्रभावी व्यासपीठ व्हावे. मातांना प्रश्न, अडचणी आणि सूचना मांडण्याची संधी मिळाल्यास शाळेवरील विश्वास वाढण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या समस्या वेळेत समजून त्यावर उपाय करता येऊ शकतात.
मेळाव्यानंतर मातांची उपस्थिती, झालेली प्रमुख चर्चा, छायाचित्रे, निश्चित केलेले संकल्प आणि पुढील कृती यांची शाळास्तरावर नोंद ठेवावी. प्राप्त सूचनांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक उपाय करावेत आणि स्थानिक गरजांनुसार त्यांचा शाळा विकास आराखड्यात समावेश करावा. माता-पालकांचा सक्रिय सहभाग, शिक्षकांचे उत्तरदायित्व आणि घर-शाळेतील सातत्यपूर्ण समन्वय यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला बळ मिळू शकते, असे कदम यांनी स्पष्ट केले आहे.
