सिगालो सुत्तातून गृहस्थ जीवनाला दिशा; सहा दिशांच्या पूजेचा खरा अर्थ काय?

सिगालो सुत्तातून कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक संबंध आणि कर्तव्यभावनेचा संदेश देत धम्म दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन बजरंग गायकवाड यांनी केले.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुका माजी कार्यकारिणी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, पवारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील पहिले पुष्प पवारवाडी येथे झाले. यामध्ये ‘सिगालो सुत्त’ या विषयावर मार्गदर्शन करताना बौद्धाचार्य बजरंग गायकवाड यांनी गृहस्थ जीवनातील नैतिक मूल्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक संबंधांचे महत्त्व सांगितले.

सहा दिशांच्या पूजेचा सांगितला अर्थ

सिगालोने केलेली सहा दिशांची पूजा आणि भगवान बुद्धांनी सांगितलेला त्यामागील अर्थ गायकवाड यांनी उलगडून सांगितला. आई-वडील, शिक्षक, पती-पत्नी व कुटुंब, मित्र-सहकारी, सेवक-कर्मचारी आणि धम्ममार्गदर्शक यांच्याप्रती असलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे हीच सहा दिशांची खरी पूजा असल्याचे त्यांनी सांगितले.

“दिशांना हात जोडण्यापेक्षा त्या दिशांमध्ये असलेल्या माणसांशी न्याय करणे, नात्यांचा सन्मान करणे आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे हीच भगवान बुद्धांनी सांगितलेली सहा दिशांची खरी पूजा आहे,” असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

बदलत्या काळातही सिगालो सुत्ताचे महत्त्व

आर्थिक प्रगतीच्या स्पर्धेत नातेसंबंध, कुटुंबातील संवाद, वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी, शिक्षकांविषयी कृतज्ञता, मित्रांमधील विश्वास आणि कामगारांप्रती माणुसकी ही मूल्ये जपणे आवश्यक असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. धम्म केवळ ऐकण्यापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संदेशही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर भालेराव होते. भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व शाखेचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, विठ्ठल निकाळजे, रामचंद्र मोरे, राजेंद्रकुमार गायकवाड, छाया गायकवाड आणि अमोल भोसले उपस्थित होते. भालेराव यांनी वर्षावासाची संकल्पना आणि बौद्ध धम्माच्या प्रसार-प्रबोधनातील त्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे विधी संचलन रामचंद्र मोरे यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!