
दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२६ | मुंबई |
ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पर्जन्यवृष्टी झाली नसली तरी हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.प्रशांत महासागरातील अल निनो स्थितीचा वाढता प्रभाव उर्वरित मान्सूनच्या हंगमावर राहील, अशी शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केली आहे.
देशात आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात ७० टक्केहून अधिक भागात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे, तर आतापर्यंतच्या मान्सूनच्या हंगामात नोंद झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार देशात १३.७ टक्के पावसाची तूट आहे. महाराष्ट्रातही अनेक भागांत पावसाची तूट कायम आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठी तूट आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. या क्षेत्राचा सर्वाधिक प्रभाव सध्या ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल आदी भागांवर आहे. दरम्यान, राज्यात विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.