
राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त फलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलात हॉकी, फुटबॉल, खो-खो व कबड्डी स्पर्धा झाल्या. विविध वयोगटांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : राष्ट्रीय खेळ दिनाचे औचित्य साधून श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलात २९ ऑगस्ट रोजी हॉकी, फुटबॉल, खो-खो आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि ‘द हॉकी सातारा’ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या स्पर्धांमध्ये १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला.
चार खेळांमध्ये रंगले सामने
दिवसभरात विविध वयोगटांमध्ये हॉकी, फुटबॉल, खो-खो आणि कबड्डीचे अटीतटीचे सामने झाले. विजेत्या संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्रे देण्यात आली. राज्य पदक विजेत्या आणि राष्ट्रीय खेळाडूंचाही विशेष सत्कार करण्यात आला.
मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर आणि ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू संजय फडतरे, बी. बी. खुरंगे आणि ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तुषार मोहिते उपस्थित होते. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिस्त आणि सातत्याला महत्त्व
महेश खुटाळे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या खेळाविषयी माहिती देत खेळातील शिस्त आणि सातत्याच्या जोरावर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकतात, असे सांगितले. प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी अशा स्पर्धांमुळे खेळाडूंमध्ये खेळाची आवड निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
तुषार मोहिते यांनी क्रीडा दिनाचे महत्त्व आणि स्पर्धांची माहिती दिली. स्पर्धांच्या आयोजनासाठी क्रीडा विभाग प्रमुख सचिन धुमाळ, अमित काळे, बोडरे, श्रवण वाळकुंदे, अविनाश गंगतीरे, गावडे, मुलानी, तुषार मोहिते, धनश्री क्षीरसागर, ऋषी पवार आणि विनय नेरकर यांनी परिश्रम घेतले. धनश्री क्षीरसागर यांनी आभार मानले.
