ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी


स्थैर्य, कोलकाता, दि. ०५ : आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्व 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. TMC च्या यादीत 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यंदा तृणमूलकडून 50 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांना संधी मिळाली आहे. उमेदवारांची यादी जाहीर केलेला तृणमूल पहिलाच पक्ष आहे.

तृणमूल दार्जिलिंगच्या 3 जागांवर आपले उमेदवार उतरवणार नाही, या जागा सहयोगी पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्रामवरुन निवडणूक लढवणार आहेत. नंदीग्राम ममता बॅनर्जींचे जवळचे आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे.

नुकतेच पक्षात सामील झालेला माजी क्रिकेटर मनोज तिवारीला पक्षाने हावडाच्या शिवपूरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय, भवानीपूरमधून शोभन देव चटोपाध्याय निवडणुकीच्या मैदानात असतील. ममता सरकारमध्ये अर्थ मंत्री राहिलेले अमित मित्रा निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाने यंदा 24 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे.

बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणूक

पश्चिम बंगालमध्ये यंदा 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 294 जागेच्या विधानसभेसाठी मतदान 27 मार्च (30 सीट), 1 एप्रिल (30 सीट), 6 एप्रिल (31 सीट), 10 एप्रिल (44 सीट), 17 एप्रिल (45 सीट), 22 एप्रिल (43 सीट), 26 एप्रिल (36 सीट), 29 एप्रिल (35 सीट) होणार आहे. तसेच, या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.


Back to top button
Don`t copy text!