श्रीमंत मालोजीराजे बँकला निश्चित पूर्व वैभव प्राप्त होईल : श्रीमंत संजीवराजे; बँक नफ्यात आल्याने बँकेस ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला


स्थैर्य, फलटण, दि. ०१ : थकीत कर्ज व त्यातून वाढलेल्या एनपीए तरतुदी यामुळे गेली ५/६ वर्षे बँक आर्थिक संकटात होती, साहजिकच ऑडीट वर्ग ही घसरला होता, यातून बाहेर पडण्यासाठी बँकेचे अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सलग २ वर्षे मोठी मेहनत घेऊन थकीत कर्जे वसुली मोहीम अत्यंत प्रभावी रीतीने राबविली त्यांना संचालक मंडळ, कर्जदार यांनी साथ केल्याने थकीत कर्जे मोठ्या प्रमाणावर वसूल झाली, एनपीए ५ टक्क्यावरुन दीड टक्क्यापर्यंत कमी झाला असून तो १ टक्क्यांपर्यंत कमी होईल, ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून बँक नफ्यात आल्याने रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचा बँकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याने नवीन शाखांना मान्यता, काही शाखा स्थलांतर वगैरे अनेक बाबी आता सोईस्कर होऊन बँक निश्चित पूर्व वैभवाप्रत पोहोचेल असा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या सभागृहात ऑनलाइन घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बँकेचे व्हा. चेअरमन सुरेश गांधी होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, हंबीरराव भोसले, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, बँकेचे सल्लागार गणेश निमकर, श्रीमंत मालोजीराजे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढा, संचालक, सभासद उपस्थित होते, तर महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सभासद ऑनलाइन सहभागी झाले होते.

श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेने सुमारे १४ कोटी रुपयांचा संचित तोटा संपवून अहवाल सालात ६५ लाख रुपये आणि आजअखेर अडीच कोटी रुपयांचा नफा तसेच ऑडीट वर्ग ‘अ’ पुन्हा प्राप्त केला असून आता बँक सक्षम आर्थिक स्थितीत भक्कमपणे उभी असल्याचे स्पष्ट करताना आगामी काळात वाहन तारण, सोने तारण, गृह तारण कर्जाला प्राधान्य देऊन कर्जे वाढविण्याचा, तसेच ठेवी २०० कोटींचा टप्पा पार केला असला तरी समाधान न मानता त्यामध्ये भरीव वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे स्पष्ट संकेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राध्येश्यामजी चांडक यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांचा परिचय झाल्यानंतर त्यांनी आपल्या बँकेला केलेल्या मार्गदर्शनाचा आणि बँकेचे सल्लागार संचालक गणेश निकम यांनी बँकेचे अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण यामुळे गेली सलग दोन वर्षे बँकेचे अधिकारी/कर्मचारी यांनी वसुलीसह बँकिंग क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञानामुळे आता बँक सर्वार्थांने सक्षम झाली असल्याने दर्जेदार बँकिंग सेवेद्वारे बँक सतत आघाडीवर राहणार असल्याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

बँकेचे लघु वित्तीय बँकेत (Small Finance Bank) रुपांतर करण्याचा विषय सभेच्या विषय पत्रिकेवर असल्याने त्याबाबत माहिती देताना मोठ्या भांडवलदारांना शेअर्स देऊन कर्ज पुरवठ्यासाठी स्वतःचा भरीव निधी उभा करण्याची ही योजना आहे, मात्र सद्यस्थितीत एक किंवा अनेक शेअर्स असले तरी एका व्यक्तीला एक मताचा अधिकार आहे, ही योजना स्वीकारल्यास जितके शेअर्स तितक्या मतांचा अधिकार एकाच व्यक्तीस प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करीत त्याबाबत अधिक माहिती घेऊन बँकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सर्वसंमतीने या बाबत निर्णय करण्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन व सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेवरील मोठे संकट टळले असून आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे आरबीआय व सहकार खात्याच्या निर्बंधांवर मात करुन आता बँक व्यवसाईक दृष्टिकोन ठेवून प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आ. दिपकराव चव्हाण यांनी केले.

बँकेचा संचित तोटा, एनपीए व अन्य बाबी पाहिल्यानंतर आरबीआय, सहकार खाते काय तो निर्णय लवकर घ्या, अन्यथा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असे सांगत, तेच अधिकारी आज सन २०२० चे ताळेबंद पाहिल्यानंतर १६ वर्षाचा तोटा कसा काय संपविला म्हणून आस्थेने चौकशी करुन सर्वतोपरी सहकार्यासाठी तयार झाल्याचे निदर्शनास आणून देत, कर्ज वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत, सकाळी ७ पासून कर्मचारी थकीत कर्जदारांच्या पुढ्यात असत त्यामुळे श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे यांना कर्जदार मंडळी फोन करुन नाराजी व्यक्त करीत परंतू सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने १५/२० वर्षाची थकीत कर्जे वसूल झाली, त्यातून संचित तोटा, एनपीए कमी झाल्याने ताळेबंद बदलल्याचे शिरीष देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिले.

गेल्या २ वर्षात केवळ कर्ज वसूली केली नाही तर आरबीआयचे सर्व निकष पूर्ण केल्याने त्यांचा कोणताही विषय, शक प्रलंबीत नाही, बँक कर्मचारी प्रशिक्षीत केले, त्यांना आधुनिक तंत्रज्ञान व बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समजावून देऊन पूर्णतः प्रशिक्षित करण्यात आल्याने आता मालोजीराजे बँक सर्वार्थाने स्पर्धेसाठी सज्ज झाल्याने आता संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान वापरुन दर्जेदार बँकिंग सेवा देण्यास बँक सज्ज असल्याचे सांगत बँकेचे संस्थापक यांनी सामान्य माणसाची आर्थिक गरज सहज भागविण्याचे उद्दिष्ट ठेऊन सलग ४५ वर्षे केलेले काम यापुढे करता येईल याची ग्वाही देत शिरीष देशपांडे यांनी बँक पूर्वपदावर येण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व संबंधीत घटकांना धन्यवाद दिले.

आगामी काळात देशाच्या ग्रामीण भागातील एक अग्रगण्य बँक असा बहुमान या बँकेला मिळणार असल्याची ग्वाही देत कर्जाचे व्याज दर राष्ट्रीय कृत बँकेच्या दराशी तुलना केल्यास त्यामध्ये फार फरक असणार नाही, गृह कर्ज ८.५ % इतका कमी राहिल्याने पुणे, सातारा येथील शाखांमध्ये या कर्जाला चांगली मागणी राहील असे सांगून बँकिंग व्यवहार वाढत असताना त्यावर योग्य नियंत्रण, शिस्त कायम राखण्यासाठी बँक संचालक मंडळाच्या संमतीने बँकिंग क्षेत्र व कुशल तंत्रज्ञान याची माहिती असणारी, जागतिक, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील बँकिंग क्षेत्राची माहिती असणाऱ्या तज्ञाचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे शिरीष देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर विषय पत्रिकेवरील या संबंधीचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब, श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर राणीसाहेब, श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन केल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे सभासद वगैरेंच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढा यांनी विषय पत्रिका वाचून त्यावरील एकेक विषय सभेसमोर ठेवून त्यावर चर्चा झाल्यानंतर सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!