शिवाजीनगर येथील मलनिस्सारण केंद्राचे श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न


स्थैर्य, फलटण, दि. ०१ : फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनिस्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

शिवाजीनगर, फलटण येथील भुयारी गटार योजनेच्या मलनिस्सारण केंद्राचे भूमिपूजन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या वेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. या वेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. ज्योत्स्ना अनिल शिरतोडे, सनी अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विधानपरिषदेचे सभापती व आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमधून फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून फलटण शहरास भुयारी गटार योजना मंजूर झालेली होती. भुयारी गटार योजनेचे काम करत असताना नक्कीच नागरिकांना थोड्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु भुयारी गटार योजनाचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाल्यानंतर फलटण मधील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सन १९९१ पासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वानी फलटण शहरासह तालुक्याचा विकास साधण्यामध्ये आपल्याला यश आलेले आहे. आगामी काळात सुद्धा हा विकासाचा रथ अविरत चालू आपल्याला पुढे न्यायचा आहे, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

शिवाजीनगर परिसरात भूमिपूजन होत असलेल्या मलनिस्सारण केंद्रामध्ये २.५ एमएलडी एवढ्या वर प्रक्रिया केली जाणार आहे. या सोबतच शेती शाळा येथे सुद्धा दुसरे मलनिस्सारण केंद्र होणार आहे. त्या मध्ये ५.५ एमएलडी एवढ्या वर प्रक्रिया केली जाणार आहे. दोन्ही मलनिस्सारण केंद्रावर प्रक्रिया करून येथील प्रक्रिया केलेले पाणी शेतीला व घरगुती वापरासाठी दिले जाणार आहे. फलटण शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ७६ किलोमीटर पैकी ४२ किलोमीटरचे कामकाज पूर्ण झालेले आहे. मे २०२१ च्या अखेर सर्व काम पूर्ण करण्याचा मानस असून भुयारी गटार योजनेचे काम जिथे जिथे पूर्ण झालेले आहे तिथे नंतर रस्त्याची कामे त्वरित सुरु करण्यात आलेली आहेत, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!